मुंबई दहशतवादी हल्ल्याबाबत पाकिस्तानची कबुली; योजना आखणाऱ्या दहशतवाद्यांची यादी जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईवर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत पाकिस्तानने मोठी कबुली दिली आहे. मुंबई हल्ल्यासाठी पाकिस्तानातून निधी पुरवण्यात आला होता. तसेच या हल्ल्याची योजना पकिस्तानातच आखण्यात आली होती, अशी कबुली पाकिस्तानने दिली आहे. पाकिस्तानने दहशतवाद्यांची एक यादी जाहीर केली आहे. त्यात 2008 मधील मुंबई दहशतवादी हल्ल्याशी थेट संबंध असणाऱ्या 19 दहशतवाद्यांचा समावेश आहे.

पाकिस्तानकडून आतापर्यंत मुंबई हल्ल्याशी संबंध असल्याचा इन्कारकरण्यात येत होता. मात्र, दहशतवाद्यांची यादी जाहीर करत पाकिस्तानने मुंबई हल्ल्याबाबत मोठी कबुली दिली आहे. पाकिस्तानच्या फेडरल इन्वेस्टिकेशन एजन्सीने मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांची ही यादी जाहीर केली आहे. त्यातील 19 दहशतवाद्यांचा मुंबई दहशतवादी हल्ल्याशी थेट संबंध आहे.

या दहशतवाद्यांच्या यादीत लश्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांची नावे आहेत. या यादीत इफ्तिकार अली, मोहम्मद अमजद खान, मोहम्मद उस्मान, अब्दुल रहमान यांच्यासह इतर दहशतवाद्यांची नावे आहेत. त्याचबरोबर मुंबई हल्ल्यासाठी पाकिस्तानातून निधी पुरवण्यात आला होता. तसेच हल्ल्याची योजना पाकिस्तानात आखली गेली होती, याची कबुली पाकिस्तानने दिली आहे. मुंबई हल्ल्यासाठी मोटर बोट, लाईफ जॅकेट आणि इतर वस्तू खरेदी करून दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांची नावेही या यादीत देण्यात आली आहेत. तसेच कराचीपासून मुंबईपर्यंत पोहचण्याची दहशतवाद्यांची व्यवस्था करणाऱ्यांचाही यादीत समावेश आहे.

26 नोव्हेंबर 2008 मध्ये मुंबईवर सागरी मार्गाने दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. सीएसटी रेल्वे स्थानक, ताज हॉटेलसह इतर महत्त्वांच्या ठिकाणांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते. या हल्ल्यात 160 पेक्षा जास्त जणांचा बळी गेला होता. या हल्ल्याविरोधातील कारवाई 3 दिवस सुरू होती. या हल्ल्यातील अजमल कसाब या दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात यश आले होते.

हिंदुस्थानने आतापर्यंत दिलेल्या अनेक पुराव्यांवरून या हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे स्पष्ट होत होते. तरीही पाकिस्तानकडून या हल्ल्याशी संबंध नसल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, आता पाकिस्ताननेच या हल्ल्याबाबत मोठी कबुली दिली आहे. मुंबई दहशतवादी हल्ल्यासह उरी, पुलवामा, पठाणकोटसह इतर ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांबाबतचे पुरावे हिंदुस्थानने दिले आहेत. त्यातही पाकिस्तानचा हात असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र, पाकिस्तानकडून त्याचा इन्कार करण्यात येत आहे.