
हिंदुस्थानने चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर पाकिस्तानचे शाहबाज शरीफ यांनी आज पाकिस्तानच्या संसदेत अक्षरशः थयथयाट केला. हिंदुस्थानच्या हल्ल्याचा बदला घेणार. जागा आणि वेळ निवडून हल्ला करणार, अशी धमकी त्यांनी दिली. पहलगाम हल्ल्याशी पाकिस्तानचे कोणतेही देणेघेणे नसल्याचा कांगावा केला.
हिंदुस्थानने पाकिस्तानमध्ये हल्ले करून युद्धासाठी चेतवले आहे, असा कांगावा पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केला. शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीत ते बोलत होते. तर दुसरीकडे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसीफ यांनी हिंदुस्थानने आपल्या हवाई हद्दीतून पाकिस्तानातील नागरी वस्त्यांवर क्षेपणास्त्र डागल्याचा कांगावा केला. तर पाकिस्तानी सैन्याने 6 हिंदुस्थानी फायटर जेट पाडल्याचा दावा पाकिस्तानी मीडियाने केला. यात 3 राफेल, 2 मिग-29 आणि 1 सुखोई यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. एलओसीजवळ हिंदुस्थानी चेकपोस्टही उद्ध्वस्त करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. रात्री 2 वाजता पाकिस्तान सरकारने सांगितले की, हल्ले 5 ठिकाणांवर झाले. यात तिघांचा मृत्यू झाला. त्यानंतर 3 तासांनी म्हणजेच पहाटे 5 वाजता इंटर सर्व्हिसेसचे पब्लिक रिलेशन्स विभागाचे संचालक अहमद शरीफ चौधरी यांनी हिंदुस्थानने 6 ठिकाणी 24 क्षेपणास्त्रs डागल्याचा दावा केला. यात 8 नागरिकांचा मृत्यू झाला असून 35 गंभीर जखमी तर दोघे बेपत्ता असल्याचे ते म्हणाले.