गोल्डन टेम्पल होते पाकड्यांचे लक्ष्य; लष्कराने डाव कसा उधळला याचे दाखवले प्रात्यक्षिक

ऑपरेशन सिंदूरने हिंदुस्थानी सैन्याची ताकद जगाला दाखवून दिली आहे. पाकड्यांनी 8 मे रोजी अमृतसर येथील गोल्डन टेम्पल म्हणजेच सुवर्ण मंदिराला लक्ष्य करत अनेक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले होते. मात्र, हिंदुस्थानी लष्कराने हे सर्व ड्रोन आणि क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट करत पाकड्यांचा डाव हाणून पाडला. ही क्षेपणास्त्रे आणि ड्रोन कसे नष्ट करण्यात आले, याचे प्रात्यक्षिक लष्कराकडून दाखवण्यात आले.

15 व्या इन्फंट्री डिव्हिजनचे जनरल ऑफिसर कमांडिंग (जीओसी) मेजर जनरल कार्तिक सी. शेषाद्री यांनी सांगितले की, लष्कराच्या हवाई संरक्षण दलाने सुवर्ण मंदिरावर डागलेले सर्व ड्रोन आणि क्षेपणास्त्रे पाडली. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत हिंदुस्थानने पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी छावण्यांवर हल्ला केल्यानंतर 8 मे रोजी पाकिस्तानने अमृतसरमधील सुवर्ण मंदिर आणि पंजाबमधील इतर शहरांना लक्ष्य करून क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले होते. मात्र, हवाई संरक्षण यंत्रणेने ते उद्ध्वस्त करत पाकड्यांचा डाव हाणून पाडला.

आम्हाला अंदाज होता की पाकिस्तान लष्कराच्या आस्थापनांना, धार्मिक स्थळांना आणि निवासी क्षेत्रांना लक्ष्य करतील. यापैकी सुवर्ण मंदिर सर्वात प्रमुख होते. सुवर्ण मंदिराला संपूर्ण हवाई संरक्षण कवच देण्यासाठी आम्ही अतिरिक्त आधुनिक शस्त्रे जमवली होती. 8 मे रोजी सकाळच्या अंधारात, पाकिस्तानने मानवरहित हवाई शस्त्रे, प्रामुख्याने ड्रोन आणि लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा वापर करून मोठा हवाई हल्ला केला. आम्ही या हल्ल्यासाठी पूर्णपणे तयार होतो कारण आम्हाला त्याची अपेक्षा होती. आमच्या शूर आर्मी एअर डिफेन्स गनर्सनी पाकिस्तानी सैन्याचे मनसुबे हाणून पाडले आणि सुवर्ण मंदिरावर लक्ष्य केलेले सर्व ड्रोन आणि क्षेपणास्त्रे पाडली. अशाप्रकारे आम्ही आमच्या सुवर्ण मंदिरावर एकही ओरखडा येऊ दिला नाही.

लष्कराने अमृतसरमधील सुवर्ण मंदिर आणि पंजाबमधील इतर शहरांना पाकिस्तानी क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांपासून कसे वाचवले हे दाखवण्यासाठी आकाश क्षेपणास्त्र प्रणाली, एल-70 हवाई संरक्षण तोफा यासह भारतीय हवाई संरक्षण प्रणालींचे प्रात्यक्षिक देखील दाखवले.