
हिंदुस्थानवर अणुहल्ला करण्याची धमकी देणाऱया पाकिस्तानी राजदूताची बोबडी आता वळली आहे. हिंदुस्थानात सध्या सुरू असलेल्या संरक्षण दल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील बैठका, क्षेपणास्त्र चाचण्या, पाकिस्तानविरोधात केलेल्या कारवाया यामुळे बिथरलेल्या पाकिस्तानी राजदूतांनी आता बचावासाठी रशियाला साकडे घातले आहे.
पाकिस्तानने जगभरातील विविध देशांमधील आपले वाणिज्य दूतावास सक्रिय केले आहेत, जेणेकरून सर्व देशांना मदतीसाठी साकडे घालता येईल. मॉस्कोतील पाकिस्तानचे राजदूत मोहम्मद खालिद जमाली यांनी हिंदुस्थानसोबतचे तणाव कमी करण्यासाठी रशियाची मदत मागितली आहे. रशियातील वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जमाली यांनी रविवारी, हिंदुस्थानने पाकिस्तानचे पाणी अडवल्यास तसेच हल्ल्याचा प्रयत्न केल्यास पाकिस्तान पूर्ण ताकदीनिशी अणुहल्ला करेल अशी धमकी दिली होती. मात्र, आता हिंदुस्थानने डोळे वटारल्यानंतर त्यांची बोबडी वळल्याचे चित्र आहे.
रशिया आणि हिंदुस्थानमध्ये विविध स्तरावर उत्तम भागीदारी आहे. त्याचप्रमाणे पाकिस्तानसोबतही रशियाचे चांगलेच संबंध आहेत. अशा परिस्थितीत 1966 च्या ताश्कंद कराराप्रमाणे रशियाने मध्यस्थी करावी आणि चांगल्या संबंधांचा वापर करावा अशी विनंती पाकिस्तानने रशियाला केली आहे.