पाकिस्तानी महिलेचे नाव मतदार यादीत, बिहारमधील धक्कादायक घटना

एका पाकिस्तानी महिलेचे नाव चक्क मतदारयादीमध्ये आढळले आहे. बिहारमध्ये ही धक्कादायक घटना घडली असून या महिलेचे नाव मतदार यादीतून काढण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे.

बिहारच्या भागलपूरमध्ये मतदार यादीच्या तपासणीदरम्यान मोठा खुलासा झाला आहे. येथे 1956 मध्ये पाकिस्तानहून आलेल्या एका महिलेचे नाव मतदार यादीत आढळले. विशेष बाब म्हणजे SIR प्रक्रियेदरम्यान तिचे नाव सत्यापित (Verify) करण्यात आले होते. गृहमंत्रालयाच्या तपासात हा प्रकार उघड झाल्यानंतर प्रशासन सतर्क झाले असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गृहमंत्रालयाने अलीकडे अशा परदेशी नागरिकांची तपासणी सुरू केली होती जे हिंदुस्थानात आल्यानंतर व्हिसाची मुदत संपूनही इथेच राहात होते. या तपासणीमध्ये भागलपूरमधील या महिलेची ओळख पटली. तपासात स्पष्ट झाले की तिचे नाव मतदार यादीत नोंदवले गेले आहे आणि आता ते काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) फरजाना खानम यांनी सांगितले की त्यांना विभागाकडून एक पत्र आले होते, ज्यामध्ये त्या महिलेच्या पासपोर्ट क्रमांकाचाही समावेश होता. क्रॉस-चेक केल्यानंतर हे उघड झाले की महिलेचे नाव मतदार यादीत आहे. त्यानंतर विभागीय आदेशानुसार तिचे नाव वगळण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

फरजाना खानम यांनी सांगितले की, मला 11 ऑगस्ट रोजी गृहमंत्रालयाकडून नोटीस मिळाली होती. त्या महिलेचे नाव इमराना खानम आहे. त्या वृद्ध असून सध्या त्यांची तब्येतही ठीक नाही. त्यांच्याकडे 1956 चा पासपोर्ट आणि 1958 चा व्हिसा आहे. त्या पाकिस्तानहून आल्या होत्या. विभागाच्या आदेशानुसार त्यांचा फॉर्म भरून नाव काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे फरजाना खानन यांनी सांगितले.

भागलपूरचे जिल्हाधिकारी डॉ. नवल किशोर चौधरी यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
त्यांनी सांगितले की पाकिस्तानी महिलेचे नाव मतदार यादीत असल्याची माहिती मिळाली होती. सत्यापनानंतर फॉर्म-7 भरून नाव काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तपास पूर्ण झाल्यावर विधिवतरीत्या त्यांचे नाव वगळले जाईल.

या सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की अखेर एका पाकिस्तानी नागरिकाचे नाव मतदार यादीत कसे आले आणि इतक्या वर्षांपर्यंत कोणालाही याची माहिती का झाली नाही. गृहमंत्रालय या पैलूची चौकशी करत आहे की यात निष्काळजीपणा झाला की जाणीवपूर्वक दस्तऐवजांमध्ये छेडछाड करण्यात आली.