पाकिस्तानी रॅपरने नेपाळमध्ये फडकवला ‘तिरंगा’; पाकड्यांनी केलं ट्रोल, व्हिडीओ व्हायरल

नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये रविवारी झालेल्या एका म्युसिक कॉन्सर्टचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होतेय. या कार्यक्रमात पाकिस्तानी रॅपर तल्हा अंजुमने हिंदुस्थाचा तिरंगा फडकवल्याने पाकिस्तानी चाहत्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

नेपाळमधील कॉन्सर्टंमध्ये रॅपर तल्हा त्याच्या ‘कौन तल्हा’ या डिस ट्रॅकवर परफॉर्म करत होता. हा ट्रॅक तल्हा अंजुमने हिंदुस्थानचा सुप्रसिद्ध ‘गली गँग’ रॅपर नेझी (Naezy) याला उद्देशून बनवला आहे. रविवारी परफॉर्मन्सदरम्यान, एका चाहत्याने हिंदुस्थानचा ध्वज स्टेजवर फेकला. यावेळी तल्हाने हा ध्वज फडकावला आणि तो पाठीवर घेऊन संपूर्ण स्टेजवर फिरला. त्यामुळे त्याचा हा व्हिडीओ काही मिनिटातच सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर पाकिस्तानी चाहत्यांनी ट्रोल करायला सुरूवात केली.

प्रचंड ट्रोलींगनंतर अंजुमने ‘X’ वर एक पोस्ट शेअर केली. यामध्ये त्याने कलेला कोणत्याही प्रकारची सीमा नसते, असे म्हटले आहे. ‘ माझ्या मनात द्वेषाला स्थान नाही आणि माझ्या कलेला सीमा नाही. मी हिंदुस्थानचा ध्वज फडकवला आणि त्यामुळे वाद निर्माण झाला असेल तरी मी ते पुन्हा करेन. मला युद्ध भडकवणारे सरकार आणि मीडियाची पर्वा नाही. उर्दू रॅपला कधीच कोणत्याही प्रकारची सीमारेषा नसेल, असे त्याने पोस्टमध्ये म्हटले आहे.

पाकिस्तानी रॅपर तल्हा अंजुमचा रॅप “कौन तल्हा” केवळ पाकिस्तानातच नाही तर हिंदुस्थानातही व्हायरल झाला होता तल्हा अंजुमचे हिंदुस्थानातही खूप फॅन्स होs. मात्र पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक पाकिस्तानी कलाकारांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर बंदी घालण्यात आली होती. यामध्ये तल्हा अंजुमचाही समावेश होता. त्यामुळे त्याचे हिंदुस्थानातील फॉलोअर्स कमी झाले.