
अमेरिका इराणमधील शांतता चर्चा अपयशी ठरल्याने आता हे दोन देश काय भूमिका घेणार, याकडे जगाचे लक्ष लागले आहे. त्यातच आता पाकिस्तानने त्यांच्या लष्कराची तुकडी सौदी अरेबियात पाठवल्याने आखाती देशात तणाव वाढण्याची शक्यता आहे. तसेच या युद्धामुळे जागतिक समीकरणे बदलत असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या वर्षी स्वाक्षरी करण्यात आलेल्या एका संयुक्त धोरणात्मक संरक्षण कराराचा भाग म्हणून सुमारे १३,००० सैनिक आणि १० ते १८ लढाऊ विमानांचा समावेश असलेली एक पाकिस्तानी लष्करी तुकडी सौदी अरेबियात दाखल झाली आहे. सौदीच्या संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या एका निवेदनानुसार किंग अब्दुलअजीज हवाई तळावर तैनात करण्यात आलेल्या या लष्करी तुकडीमध्ये पाकिस्तान हवाई दलाची लढाऊ विमाने आणि सहाय्यक विमानांचा समावेश आहे.
या लष्करी तैनातीचा उद्देश दोन्ही देशांच्या सशस्त्र दलांमधील संयुक्त लष्करी समन्वय वाढवणे, त्यांची मोहिमांसाठीची सज्जता सुधारणे, तसेच प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरक्षा व स्थैर्याला बळ देणे हा आहे. पाकिस्तान सरकारच्या एका अधिकाऱ्यानेही, दोन्ही देशांमधील धोरणात्मक संरक्षण कराराचा भाग म्हणून सौदी अरेबियात सैनिक आणि विमाने पाठवल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या करारानुसार, एका देशावर झालेला कोणताही हल्ला हा दुसऱ्या देशावर झालेला हल्ला मानला जाईल.
सौदी-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर झालेली ही तैनाती एक मोठा प्रश्न निर्माण करते. इराणने सौदी अरेबियावर हल्ला केला, तर हे सैनिक त्या लढाईत सामील होऊ शकतात. त्यामुळे हे सैन्य इराणविरुद्ध लढायला जात आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दोन्ही देशांमधील लष्करी सहकार्य वाढवण्यासाठी हे करण्यात आले आहे, असे दोन्ही देशांकडून सांगण्यात येत आहे. याचा उद्देश दोन्ही देशांच्या सैन्यांना अधिक चांगल्या प्रकारे एकत्र काम करण्यास सक्षम करणे आणि प्रदेशातील सुरक्षा मजबूत करणे हा आहे. पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांचे दीर्घ आणि मजबूत संबंध आहेत. पाकिस्तानने यापूर्वी सौदी अरेबियाला लष्करी मदत पुरवली आहे.

























































