
राजस्थानमध्ये लष्कराचे गणवेश विकणाऱया एका व्यक्तीला हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. हा तरुण पाकिस्तानी गुप्तचर संस्थेसाठी हेरगिरी करत असल्याचा संशय आहे. आनंदराज सिंग (वय 22) असे या व्यक्तीचे नाव असून तो राजस्थानच्या गंगानगर जिह्यातील रहिवाशी आहे. लष्कराचे गणवेश विकण्याचा व्यवसाय तो करत होता. मात्र, मागील काही दिवसांपासून त्याच्या संशयास्पद हालचाली आढळून आल्याने पोलिसांनी त्याची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली.
सोशल मीडियाद्वारे संपर्कात
राजस्थानच्या गंगानगर जिह्यातील सूरतगड आर्मी कॅन्टोन्मेंटच्या बाहेर आनंदराज सिंग गणवेशाचे दुकान चालवतो. मात्र, तो सोशल मीडियाद्वारे पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या तीन महिलांच्या सतत संपर्कात असल्याची माहिती समोर आली.
महत्त्वाची माहिती दिल्याचा संशय
लष्करासंदर्भातील महत्त्वाची माहिती गोळा करून त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानच्या तीन महिलांना दिल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणी या व्यक्तीला अटक करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.
हेरगिरीच्या कारवायांवर राजस्थान पोलिसांच्या गुप्तचर विभागाकडून सातत्याने लक्ष ठेवले जात असल्याचे संजय अग्रवाल यांनी सांगितले. आनंदराज सिंग या व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद आढळल्यानंतर सुरक्षा यंत्रणांच्या चौकशीतून तांत्रिक माहिती मिळवण्यात आली. यानंतर त्याच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे त्याला अटक केली.



























































