विठुनामाच्या जयघोषाने मुंबापुरी दुमदुमली, माऊली माऊली रूप तुझे…

टाळ-मृदंगाचा गजर, हातात भगव्या पताका, डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन विठुनामाचा जयघोष करत राम मंदिर-कॉटन ग्रीन ते विठ्ठल मंदिर-वडाळा या दरम्यान रविवारी पालखी सोहळा पार पडला. पालखीसोबत दिंडी आणि रिंगण सोहळ्यामुळे मुंबईत अवघे पंढरपूर अवतरले.

श्री वारकरी प्रबोधन समितीच्या वतीने या पालखी सोहळ्याचे आयोजन केले जाते. पालखी प्रस्तानाचे कीर्तन सुजाताई गोपाळ यांनी केले. त्यानंतर संत संमेलन झाले. शिवसेना नेते–खासदार अरविंद सावंत, मनसे नेते बाळा नांदगावकर, आमदार मनोज जामसुतकर यावेळी उपस्थित होते. प्रास्ताविक श्री वारकरी प्रबोधन महासमितीचे अध्यक्ष रामेश्वर महाराज शास्त्राr यांनी केले. तसेच वारकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांचे विशेष आभार मानले. पुंडलिक महाराज जंगले शास्त्री यांनी या सोहळ्याचे कौतुक केले. वारकरी प्रबोधन महा समितीचे सचिव नाना निकम, खजिनदार बळवंत महाराज आवटे, विश्वस्त बाबासाहेब मिसाळ, विलास घुले, दीपक शिंदे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन शामसुंदर महाराज सोन्नर यांनी केले.

दैनिक सामनाच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा समाजप्रबोधन पुरस्कार ... तुकाराम महाराज जेऊरकर यांना शिवसेना नेतेखासदार अरविंद सावंत, मनसे नेते बाळा नांदगावकर, ... रामेश्वर महाराज शास्त्री आणि दैनिक सामनाचे नॅशनल हेड (मार्केट डेव्हलपमेंट) दीपक शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 

जागोजागी रांगोळ्या, पृष्पवृष्टीने स्वागत 

‘लालबागचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सचिव सुधीर साळवी आणि मंडळातील सर्व पदाधिकाऱ्यांकडून जोरदार पुष्पवृष्टी करून पालखीचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. तसेच वारकऱ्यांना अल्पोपाहार देण्यात आला. अनिल पाटील मित्र परिवाराच्या वतीने सहकार भवन, परळ येथे पालखीचे स्वागत व फराळ वाटप करण्यात आले.

n संत संमेलनात नामदेव महाराजांचे वंशज केशव महाराज नामदास यांना ‘वारकरी रत्न’ पुरस्काराने तर पुंडलिक महाराज जंगले शास्त्री यांना ‘हैबती बाबा सेवा पुरस्कारा’ने गौरविण्यात आले.