
ब्राझीलचे सर्वकालिन महान फुटबॉलपटू पेले यांचे पार्थिव मंगळवारी साओ पावलो शहरातील मेमोरियल पोपोल एक्युमेनिका येथे दफन करण्यात आले. फुटबॉलच्या या देवाला अखेरचा निरोप देण्यासाठी चाहत्यांची गर्दी उसळली होती. आपल्या या लाडक्या फुटबॉलपटूला अखेरचा निरोप देताना चाहत्यांना हुंदके अनावर झाले होते, त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला होता. चाहत्यांना आणि ब्राझीलमधील नागरिकांना पेले यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता यावे यासाठी ही अंत्ययात्रा साओ पावलो शहराच्या गल्ल्यांमधून नेण्यात आली. मागील गुरुवारी वयाच्या 82 व्या वर्षी पेले यांचे कर्करोगाने निधन झाले होते. ब्राझीलसह जगाच्या कानाकोपऱयातून येणाऱया प्रत्येक चाहत्याला पेले यांचा चेहरा पाहता यावा म्हणून मंगळवारी सायंकाळपर्यंत त्यांचे पार्थिव सॅण्टोस क्लबच्या विला बेलमिरो स्टेडियमवर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.




























































