कौटुंबिक वादातून काकीनेच दिली पुतण्याची सुपारी, नऊ दिवसांत पोलिसांनी केली गुन्ह्याची उकल

कौटुंबिक वादातून काकीनेच पुतण्याला जीवे मारण्याची सुपारी दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. राधिका मनोरे उर्फ राधिका जाधव असे या माथेफिरू काकीचे नाव आहे. घरगुती भांडणाचा राग मनात धरून राधिकाने पुतण्या ऋषिकेश मनोरे याला ठार मारण्यासाठी तीन जणांना एक लाखाची सुपारी दिली. दरम्यान या तिघा मारेकऱ्यांनी ऋषिकेशवर जीवघेणा हल्ला करून फरार झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत नऊ दिवसांत त्यांच्या मुसक्या आवळल्या आणि या गुन्ह्याची उकल झाली.

20 जुलै रोजी ऋषिकेश मनोरे हा तरुण रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास आगरआळीच्या बाजारपेठेतील दुकान बंद करून घरी जाण्यासाठी निघाला. त्यावेळी जैन मंदिराजवळ तीन जणांनी त्याची स्कुटी अडवली आणि डोळ्यात मिरचीची पूड टाकून धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात ऋषिकेशच्या डोक्याला आणि हातापायाला गंभीर दुखापत झाली. दरम्यान नागरिकांनी ऋषिकेशला वाडा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले. याप्रकरणी वाडा पोलिसांनी अनोळखी हल्लेखारांविरोधात गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली.

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत तांत्रिक यंत्रणा व सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोरांचा शोध सुरू केला. या हल्लेखोरांची ओळख पटताच पोलिसांनी सुशांत चिडे, तुषार मनवर व यश करंजे या तिघांवर झडप टाकली. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच ऋषिकेशच्या काकीने त्याला ठार मारण्याची सुपारी दिल्याची कबुली या हल्लेखोरांनी पोलिसांना दिली. या हल्ल्यानंतर काकी राधिका ही फरार असून तिचा शोध पोलीस घेत आहेत. तर जखमी ऋषिकेशवर ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

मंगळसूत्र लांबवले

भिवंडी – पादचारी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून चोरट्यांनी पोबारा केल्याची घटना उघडकीस आली आहे. अरुणा किरवे (55) या मुलीसोबत भाजी आणण्यासाठी बाजारात गेली असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी दोन तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र लांबवले. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिम ट्रेनरला अटक

ठाणे – शरीर सुडौल बनवण्यासाठी जिममधील तरुणांना बेकायदेशीरपणे औषधांची विक्री करणाऱ्या जिम ट्रेनरला गुन्हे शाखा घटक पाचच्या पथकाने अन्न व औषध प्रशासनाच्या मदतीने बेड्या ठोकल्या आहेत. मंगेश परब (32) असे या जिम ट्रेनरचे नाव असून त्याच्याकडून बॉडी फुगवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मेफेंटरमाईन सल्फेट इंजेक्शन आयपी औषधाच्या २९० बाटल्यांचा साठा जप्त केला आहे. त्याने ही औषधे कुठून आणली याचा तपास पोलीस करत आहेत.