आदिवासी विद्यार्थ्यांच्या नशिबी ‘च’ चिखलाचा; तलासरीतील बेंडगपाड्यात शैक्षणिक विकासाचा फक्त ‘भुसा’च

शिक्षणावर राज्य सरकार कोट्यवधी रुपये खर्च करीत असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात आदिवासी बहुल तलासरी तालुक्यातील बेंडगपाड्यात शैक्षणिक विकासाचा फक्त ‘भुसा’च दिसून येत आहे. वाट नसल्याने विद्यार्थ्यांना नदी तुडवत शाळा गाठावी लागत असून त्यांच्या नशिबी केवळ ‘च’ चिखलाचा असल्याची धक्कादायक बाब आढळून आली आहे. जीवावर उदार होऊन नदी तसेच चिखलातून कशीबशी वाट काढत मुले शाळेत जात असल्याने पालक आणि स्वयंसेवी संस्थांनी संताप व्यक्त केला आहे. नदीवर किमान पूल तरी उभारावा आणि पक्का रस्ता बांधावा, अशी कळकळीची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

तलासरी तालुक्याच्या सूत्रकार गावातील बेंडगपाडा येथे 550 ते 600 लोकवस्ती आहे. पावसाळ्यामुळे दळणवळणाची साधने पूर्णपणे ठप्प झाली आहेत. सूत्रकार गावातील काळू नदीच्या पलीकडे वसलेल्या या वस्तीत पोहोचण्यासाठी एकमेव पायवाट वगळता कोणताही पक्का रस्ता नाही. त्यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच हा एकमेव मार्ग पूर्णपणे चिखलाने भरलेला आहे. काळू नदी पावसात दुथडी भरून वाहत असून यामुळे येथील रहिवाशांना, विशेषतः विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

  • गेल्या अनेक वर्षांपासून काळू नदीवर पूल बांधून मिळावा अशी मागणी होत आहे. मात्र अनेकवेळा ठराव घेऊनही पूल आणि रस्ता केला जात नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
  • बेंडगपाडा ते काटेलपाडा सुमारे अडीच ते तीन किमी कच्चा रस्ता असून या रस्त्यावरून जिल्हा परिषद शाळा, आश्रम शाळा व इतर शाळा गाठाव्या लागतात.
  • पावसाळ्यात गुडघाभर चिखलातून चप्पल आणि बूट हातात घेऊन मार्ग काढावा लागत आहे. कपडे चिखलाने माखले की मुलांना शाळेत जाता येत नाही.

शिक्षणमंत्री.. एकदा तरी भेट द्या!

चिखलमय रस्ता आणि नदी तुडवत बेंडगपाड्यातील मुला-मुलींना शाळेत जावे लागते. ‘च’ चिखलाचा याचा प्रत्यक्ष विदारक अनुभव आदिवासी मुले घेत असून राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी एकदा तरी आमच्या गावाला भेट द्यावी, अशी मागणी ग्रामस्थ सुनील बेंडगा, विद्यार्थी स्वप्नील बेंडगा यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी केली आहे.