
महाविनाशकारी वाढवण बंदराविरोधात आज हजारो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. या बंदराविरोधात पालघर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा नेत या नागरिकांनी जोरदार आंदोलन केलं. पालघर जिल्ह्याच्या इतिहासातील अभूतपूर्व व ऐतिहासिक जनआंदोलन यावेळी पाहायला मिळाले. .
या आंदोलनात मच्छिमार व मच्छिमार महिला, आदिवासी बांधव, डाय मेकर कामगार, शेतकरी, कष्टकरी आणि पालघर जिल्ह्यातील स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्व समाजघटकांचा एकत्रित आणि ठाम विरोध या आंदोलनातून स्पष्टपणे व्यक्त झाला.
आंदोलकांनी वाढवण बंदर, प्रस्तावित विमानतळ, मुरबे बंदर, केळवे वस्त्रोद्योग (टेक्सटाईल) पार्क आणि तथाकथित ‘चौथी मुंबई’ या प्रकल्पांना तीव्र विरोध दर्शवला. हे प्रकल्प पर्यावरणदृष्ट्या घातक, सामाजिकदृष्ट्या अन्यायकारक आणि स्थानिक जनतेच्या अस्तित्वावर घाला घालणारे असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
आंदोलकांनी स्पष्ट केले की लोकांच्या उपजीविका, पर्यावरण, घटनात्मक हक्क आणि स्थानिक संमती यांना डावलून केलेला तथाकथित विकास स्वीकारार्ह नाही. जनसुनावणीतील त्रुटी, अपुरे व दिशाभूल करणारे पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन (EIA) अहवाल आणि आदिवासी, किनारी व पारंपरिक समुदायांच्या हक्कांकडे केलेले दुर्लक्ष यावर तीव्र आक्षेप नोंदवण्यात आला.
आजच्या प्रचंड आणि एकसंघ उपस्थितीतून शासन व प्रकल्प प्रायोजकांना स्पष्ट संदेश देण्यात आला की – “पालघरची जमीन, समुद्र, उपजीविका आणि भवितव्य उद्ध्वस्त करणारा विकास पालघरकर मान्य करणार नाहीत.”
या आंदोलनातून सर्व विनाशकारी प्रकल्प तात्काळ रद्द करण्याची आणि लोककेंद्रित, पर्यावरणपूरक व शाश्वत विकास धोरण राबवण्याची ठाम मागणी करण्यात आली. जनतेचा आवाज दुर्लक्षित केला गेला तर हे आंदोलन अधिक तीव्र स्वरूपात पुढे नेले जाईल. येतो सिर्फ झाकी है, मुंबई अभी बाकी है, असा इशारा आंदोलकांनी सरकारला दिला.
आंदोलनादरम्यान झालेल्या भाषणांमध्ये खालील गंभीर परिणामांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली:
– पारंपरिक मच्छिमार व्यवसाय आणि सागरी परिसंस्थेचा नाश
– आदिवासी व शेतकरी समाजाचे मोठ्या प्रमाणावर विस्थापन
– शेती जमीन, मिठागारे, मॅन्ग्रोव्ह आणि किनारी सामायिक साधनसंपत्तीचा नाश
– पर्यावरणदृष्ट्या अतिशय संवेदनशील भागात अपरिवर्तनीय हानी
– पालघरच्या स्थानिक संस्कृती, परंपरा व सामाजिक रचनेचे विद्रुपीकरण





























































