रात्री अकरापर्यंत मतदानासाठी रांगा; आयोगाचा भोंगळ कारभार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
printed-receipt-evm

सामना ऑनलाईन । पालघर

मतदानाची जय्यत तयारी झाली असल्याचा निवडणूक अधिकाऱयांचा दावा फोल ठरल्याचे पालघर लोकसभा निवडणुकीच्या वेळी सोमवारी दिसून आले. मतदानाची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत असतानाही प्रत्यक्षात वसई तसेच अन्य भागातील मतदान केंदांवर रात्री अकरापर्यंत मतदानाची प्रकिया सुरू होती. त्यामुळे मतदारांनाही प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. अनेकदा मतदान यंत्रे बंद पडणे, साहित्य वेळेवर न पोहोचणे, कर्मचाऱयांचा संथ कारभार यामुळे पालघरमध्ये एक रात्र ‘मत’रलेली ठरली. रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू असल्याचा प्रकार प्रथमच पालघर लोकसभा मतदारसंघात झाला. दरम्यान या भोंगळ कारभाराची चौकशी करण्याची मागणी अनेकांनी केली आहे.

पालघरमध्ये शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीचे राजेंद्र गावीत व बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांच्यात मुख्य लढत होत आहे. येथे एकूण 18 लाखांहून अधिक मतदार असून ही संख्या लक्षात घेऊनच मतदान केंदावर जिल्हा निवडणूक यंत्रणेने तयारी केली होती, पण प्रत्यक्षात ही तयारी फोल गेल्याचे दिसून आले. सोमवारी सकाळी सातपासून प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होताच अनेक भागांमध्ये मतदान यंत्रेच बंद पडली होती. दुसरे मशीन सुरू करेपर्यंत एक तासाहून अधिक कालावधी लागला. त्यामुळे मतदारांना बराच वेळ ताटकळत रांगेत उभे राहावे लागले.

  • वसईतील पेल्हारमध्ये एक ईव्हीएम मशीन बंद पडले. त्यामुळे केंद्राबाहेर मतदारांची मोठी रांग लागली. त्यामुळे तिथे रात्री अकरापर्यंत मतदानाची प्रकिया सुरू होती.
  • चंदपाडा येथील केंद्रावर तर फक्त एकच मतदान यंत्र होते. त्यामुळे सकाळपासून तिथे संथगतीने मतदान सुरू होते. आजूबाजूच्या पाडय़ांवरील रहिवाशांचेही येथेच मतदान होते, पण एकच मशीन असल्याने गर्दी झाली आणि रात्री दहापर्यंत मतदान सुरू ठेवावे लागले.
  • धानीव बाग येथील किरण पाटील शाळेतही रात्री सवानउै वाजता शेवटच्या मतदाराने मतदान केले. पालघर लोकसभा मतदारसंघातील डहाणू, विक्रमगड, पालघर, बोईसर, नालासोपारा, वसई येथेही मतदानाच्या वेळेस मोठा गोंधळ उडाला. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत मतदानाची अंतिम आकडेवारी अधिकाऱयांना जाहीर करता आली नाही.