
आषाढी वारीचा सोहळा जसजसा जवळ येतोय, तसतसे आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्या विठ्ठलभक्तीला उधाण येऊ लागले आहे. वारी नियोजनाचा आढावा, याचे निमित्त साधून रोज कोणी ना कोणी व्हीआयपी पंढरपूर दौऱ्यावर येत आहेत. याचा दर्शनरांगेतील भाविकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. शिवाय वारीच्या नियोजनात गुंतलेल्या अधिकाऱ्यांची ससेहोलपट होताना दिसते. मंत्र्यांच्या या अनाकलनीय दौऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी वेळीच आवर घालण्याची गरज आहे.
आषाढी वारीचा सोहळा आठवडाभरावर आला आहे. सोहळ्यासाठी येणाऱ्या वारकरी भाविकांना आवश्यक त्या मूलभूत सेवा-सुविधा पुरविण्यासाठी शासकीय यंत्रणेची दमछाक होत असताना, रोज व्हीआयपींचे दौरे होत आहेत.
वारी नियोजनाचा आढावा घेण्याचे निमित्त करून आलेली ही राजकीय मंडळी आढावा घेऊन आल्या पावलांनी परतीचा रस्ता धरत नाहीत, तर ते थेट शॉर्टकट मार्गाने श्री विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनाला जातात. या राजकीय व्हीआयपी नेत्यांसोबत त्यांचे पाच-पन्नास कार्यकर्तेदेखील दर्शनासाठी मंदिरामध्ये घुसखोरी करतात. मंदिरातील या राजकीय घुसखोरीमुळे पोलीस, मंदिर प्रशासन आणि नेते यांच्यात रोज शाब्दिक चकमकी झडत आहेत. व्हीआयपींचे दर्शन आणि त्यांचा सत्कार यातच शासकीय यंत्रणेचा वेळ वाया चालला आहे. या राजकीय नेत्यांचा त्रास केवळ प्रशासनाला नाही, तर रांगेत अनेक तास तिष्ठत उभ्या असणाऱया वयोवृद्ध भाविकांना बसतो आहे.
वारीच्या तोंडावर कामांचा आढावा घेण्याची नौटंकी करणाऱया राजकीय नेत्यांच्या दौऱयाला मुख्यमंत्र्यांनी वेळीच रोखले नाही, तर भाविकांच्या सेवा-सुविधांमध्ये कसूर होऊ शकते.


























































