उजव्या हाताऐवजी डाव्या हातावर केली शस्त्रक्रिया! डॉक्टरांवर कारवाईची मागणी; पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयातील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये एका बालकाच्या उजव्या हातावर शस्त्रक्रिया करण्याऐवजी डाव्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याच्या घटनेने पालकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे रुग्णालयातील रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणाची समितीमार्फत चौकशी करण्यात येणार आहे. दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा रुग्णालयाने दिला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे.

पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात सुनील दंडाडे यांच्या मुलाच्या उजव्या हातावरील खराब झालेल्या करंगळीची शस्त्र्ाक्रिया करण्यासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉ. काणे यांनी निष्काळजीपणा करून चुकीची शस्त्र्ाक्रिया केली. मुलाच्या उजव्या हाताची करंगळी काढण्याऐवजी डाव्या हाताची करंगळी काढली. यामुळे पालकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेची गंभीर दखल बहुजन वंचित आघाडीने घेतली असून, डॉ. काणे यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना सोयीसुविधा मिळत नसल्यामुळे रुग्णांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

चौकशी समिती गठीत

– उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. विजयकुमार सरडे यांनी या प्रकरणाची दखल घेत शस्त्रक्रीया प्रकरणाच्या चौकशीसाठी दोन डॉक्टरांची समिती गठीत केली आहे. चौकशी करून जर डॉक्टर दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाईचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविणार असल्याचे डॉ. सरडे यांनी सांगितले.