
माघ यात्रा दरवर्षी माघ शुध्द 11 जया एकादशी या दिवशी भरते. माघी यात्रा दिनांक 29 जानेवारी, रोजी असून, या यात्रा कालावधीत सुमारे 3 ते 4 लाख भविक श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येतात . यात्रा कालावधीत येणाऱ्या भाविकांना सुलभ व जलद दर्शनाबरोबरच आवश्यक सोयी-सुविधा मंदिर समितीच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
या यात्रा कालावधीत श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिराशी संबंधित असलेल्या परंपरांचे कटाक्षपणे पालन करण्यात येणार असून, त्याबाबतचे आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये नवमीला श्री.ह.भ.प. वासकर महाराज यांची दिंडीं, ह.भ.प. आजरेकर महाराज पंढरपूर यांचा व्दादशीला नैवेद्य, त्रयोदशीला श्री.ह.भ.प.औसेकर महाराज यांचे चक्रीभजन करण्याची परंपरा असून, एकादशीला पहाटे श्री विठ्ठल रूक्मिणी मातेची नित्यपूजा मंदिर समिती मार्फत संपन्न होत आहे.
आपत्कालिन व्यवस्थेच्या दृष्टीने सोलापूर महानगरपालिका यांचेकडील रेस्क्यू व्हॅन प्रशिक्षित कर्मचा-यासह, सिझफायर यंत्रणा, अत्याधुनिक 100 नग सीसीटीव्ही कॅमेरे व त्यासाठी कंट्रोल रूम, वायरलेस यंत्रणा, जनरेटर, मेटल डिटेक्टर, मोबाईल लॉकर, चप्पल स्टँड, सार्वजनिक प्रसारण सुचना प्रणाली, चौकशी कक्ष, बँग स्कॅनर मशिन, अपघात विमा पॉलीसी इ. व्यवस्था करण्यात आली आहे. आरोग्य व्यवस्थेसाठी पत्राशेड येथे तालुका आरोग्य विभागाचा वैद्यकीय कक्ष, उपजिल्हा रूग्णालया मार्फत दर्शनमंडप येथे आयसीयू तसेच वैष्णव चॅरीटेबल ट्रस्ट, मुंबई यांच्याकडून मोफत वैद्यकीय सेवा व मंदिर परिसरात वैद्यकीय पथकासह दोन अद्यावत रूग्णवाहिका सज्ज ठेवण्यात येत आहेत. स्वच्छतेसाठी मंदिर, दर्शनमंडप, तुकाराम भवन येथील स्वच्छता मंदिर कर्मचा-यांमार्फत व नगरप्रदक्षिणा, दर्शनरांग, मंदिर प्रदक्षिणा आदी ठिकाणची स्वच्छता आउट सोर्सिंग पद्धतीने करण्यात येत आहेत. या कामी स्वकाम सेवा आळंदी व संत ज्ञानेश्वर सेवा मंडळ आळंदी या स्वयंसेवी संस्थाची मदत घेण्यात येत असून, स्वच्छतेसाठी विशेष लक्ष देण्यात येत आहे. तसेच अन्नछत्रामध्ये दु.12.00 ते 2.00 व रा.7.00 ते 9.00 या वेळेत अन्नदान सुरू राहणार असून, दर्शनरांगेत चहापान, तांदळाची अथवा शाबुदाणाची खिचडी वाटप करण्यात येत आहे असे व्यवस्थापक संदेश भोसले यांनी सांगीतले.
दर्शनरांग व्यवस्थापनाच्या दृष्टीने स्कायवॉक पासून पत्राशेड पर्यंत बॅरीकेटींग करून त्यावर ताडपत्री टाकणे व कायमस्वरूपी 4 पत्राशेड येथे तात्पुरते 4 असे एकूण 8 पत्राशेड उभारण्यात आले आहेत. या दर्शनरांगेत बसण्याची सुविधा, थंड पिण्याचे पाणी, तात्पुरते उड्डाणपुल, शौचालये, विश्रांती कक्ष, बाथरूम, लाईव्ह दर्शन इ. सुविधा उपलब्ध आहेत. याशिवाय, महिला भाविकांच्या सोईसाठी सॅनिटरी नॅपकीन, हिरकणी कक्ष तसेच श्रींचा प्रसाद म्हणून बुंदी व राजगिरा लाडूप्रसादाची उपलब्धी तसेच वेदांता, व्हीडीओकॉन व श्री.विठ्ठल रूक्मिणी या 3 भक्तनिवासामधील 361 रूममध्ये सुमारे 1600 भाविकांची निवास व्यवस्था करण्यात येत आहे. श्रीची दर्शन रांग सुलभ व जलद गतीने चालवण्यासाठी अनुभवी कमांडोजची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच भाविकांच्या शुभहस्ते होणाऱ्या पूजेची संख्या कमी करून, व्हीआयपी दर्शनावर निर्बंध व दर्शनाची वेळ वाढवून सकाळी 6.00 ते रात्री 12.00 करण्यात आली आहे. सदर यात्रा निर्विघ्नपणे – सुरळीत पार पाडण्यासाठी व भाविकांना केंद्रबिंदू मानून त्यांना अधिकाधिक सोई सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने मंदिर समितीचे सदस्य, अधिकारी, विभाग प्रमुख, कर्मचारी वर्ग परिश्रम घेत असून, 1200 कर्मचारी व स्वयंसेवक सेवा पार पाडणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.



























































