पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा पोट निवडणुकीत भाजपचे समाधान आवताडे 3733 मतांनी विजयी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतलेल्या पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार समाधान आवताडे हे 3733 मतांनी विजयी झाले. तर राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके हे पराभूत झाले. राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक लागली होती. या निवडणुकीत 19 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी आवताडे विजयी झाल्याचे घोषित करताच आवताडे आणि परिचारक सर्मथकांनी एकच जल्लोष केला.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही निवडणूक खूपच प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे हा मतदारसंघ अबाधित राखण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पालकमंत्री दत्तात्रय भरणे आदी नेते पंढरपूर मध्ये तळ ठोकून होते. या निवडणूक प्रचारात स्थानिक मुद्द्यापेक्षा राज्य व देशपातळीवरील मुद्दे गाजले. दोन्ही पक्षातील नेत्यांनी सभांची जोरदार मैदान गाजविली.

आवताडे यांच्या विजयासाठी भाजप आमदार प्रशांत परिचारक यांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली होती. स्वतः प्रशांत परिचारक, त्यांचे भाऊ उमेश परिचारक, पुतणे प्रणव परिचारक आणि त्यांची संपूर्ण यंत्रणा आवताडे यांना विजयी करण्याच्या जिद्दीने कामाला लागली होती.

तर दुसरीकडे भालके गट सहानुभूतीच्या लाटेवर निवडून आल्यात जमा असल्याच्या अविर्भावात प्रचार यंत्रणा राबवित होती. मतदानादिवशी तर भालके समर्थकांची यंत्रणा पूर्ण कोलमडून गेली होती अनेक बुथवर कार्यकर्ते दिसत नव्हते.

विठ्ठल परिवार, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी सगळी ताकद भालकेच्या पाठीशी होती मात्र मतदारांना लक्ष्मी घडविण्यात यंत्रणा कमी पडली. त्या तुलनेने आवताडेच्या यंत्रणेचे होते. त्यात आवताडे कुठेही कमी पडले नाहीत.

त्यामुळे 14 एप्रिलपर्यंत आघाडीवर असलेले भालके शेवटच्या टप्प्यात मागे पडले. आणि त्यांना निसटता पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्या फेरीपासून दोघांत रस्सीखेच सुरु होती ती शेवट पर्यत राहिली मात्र 3733 मतांनी आवताडे यांनी आघाडी घेतली त्यात पंढरपूर शहर व तालुक्यातून आवताडे यांना 900चे लीड मिळले तर उर्वरित मंगळवेढा तालुक्यातून मिळाले.