
पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखला जाणारा पंढरपूर कॉरिडॉर रद्द करावा, या मागणीसाठी नागरिकांनी पंढरपूर तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. या मोर्चात चिमुकल्या बालकांसह अबालवृद्ध नागरिक सहभागी झाले होते.
पंढरपूर कॉरिडॉर हा या तीर्थक्षेत्राचे वैभव, पावित्र्य आणि परंपरा नष्ट करणारे आहे. यापूर्वी देशभरात जिथे जिथे कॉरिडॉर झाले आहेत, त्याठिकाणी देवदेवतांची मंदिरे, धार्मिक स्थळे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. त्याच धर्तीवर पंढरपूरमध्ये कॉरिडॉर लादला जात आहे. देशाच्या नेतृत्वाला तीर्थक्षेत्राचे नाव पुसून पर्यटनक्षेत्र करण्यात अधिक रस असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. पंढरपूर हे प्राचीन शहर असून, शहराला आध्यात्मिक महत्त्व आहे. कॉरिडॉरमुळे शहराची ओळख पुसली जाणार असल्याने वारकरी संप्रदायात संतापाची भावना आहे.
महाद्वारातील संत श्री नामदेव महाराजांच्या पायरीचे माऊली महाराज शिरवळकर, वडगावकर महाराज, देहूकर महाराज आदींच्या हस्ते पूजन करून मोर्चाला प्रारंभ झाला. आजपर्यंत बाधित भागातील नागरिकांनी कॉरिडरविरोधात केलेल्या आंदोलनात आजचा मोर्चा सर्वांत मोठा ठरला. सुमारे दोन हजारांहून अधिक नागरिकांनी मोर्चात सहभाग घेतला. यात महिलांची संख्या मोठी होती. ‘एकच जिद्द कॉरिडोर रद्द’, ‘जुलमी कॉरिडॉर रद्द करा’, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. पंढरपुरात एकरांच्या मापात व डझनांच्या संख्येने मोठमोठय़ा सरकारी जागा बिगर उपयोगाच्या पडून आहेत. त्यावर शासनाने कॉरिडॉरसारखे प्रकल्प उभे करावे, बाधितांच्या ज्या घरांमध्ये वारकरी बांधवांच्या सगळ्या सोयी होतात, ती घरे पडू नका. कॉरिडॉर सरकारी जागांवर करावा, अशा मागण्या आंदोलकांनी केल्या. मोर्चा तहसील कचेरीकडे जाताना चौका-चौकात भाषणे झाली. मोर्चा तहसील कचेरी आला तेव्हा बचाव समितीचे अध्यक्ष अभयसिंह इचगावकर, आमदार अभिजीत पाटील, नगरसेवक शिंदे, किरण घाडगे, वडगावकर महाराज, शिरवळकर महाराज इत्यादींची भाषणे झाली. तहसीलदार लंगोटे यांना निवेदन देण्यात आले. राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये कॉरिडरसाठी तरतूद होणार, अशी चर्चा असताना कॉरिडोरला पंढरपुरातून फार मोठा विरोध दिसून येत आहे. मोर्चात नानासाहेब कवठेकर, नगरसेवक ओंकार जोशी, रा. पां. कटेकर, उद्योजक संजय जव्हेरी, विवेक जव्हेरी, गणेश लंके, वैभव बडवे, अनिल गवळी, प्रशांत खंडागळे, यशवंत बेणारे, उंडाळे वकील यांच्यासह नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
























































