रत्नागिरी – पांढऱ्या समुद्रात तिघे बुडाले, एक बेपत्ता; दोघांना वाचवण्यात यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पांढरे समुद्र येथे पोहायला उतरलेले तीन तरुण बुडाल्याची घटना सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. यातील दोघांना वाचवण्यात यश आले असून एक जण बेपत्ता झाला आहे.

फिनोलेक्स कॉलनी शेजारी कोस्ट गार्डच्या रहिवासी इमारतीचे काम सुरू आहे. या ठिकाणी मजूर म्हणून कामाला असलेले तीन तरुण समुद्राच पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी पांढरा समुद्र येथे दाखल झाले होते. मद्यधुंद अवस्थेत हे तरुण समुद्रावर आले होते. समुद्राच्या पाण्यात सेल्फीसह व्हिडिओ चित्रिकरण सुरू होते.

एक तरुण हा मोबाईलवर चित्रीकरण करीत होता तर दोघेजण समुद्रात लाटांवर उड्या मारत होते. बघता बघता त्यातील एक जण पाण्यात ओढला गेला आणि अचानक गायब झाला. त्याला वाचवायला गेलेले दोन्ही तरुणही पाण्यात ओढले गेले. याची माहिती मिळताच मुरुगडा परिसरातील ग्रामस्थांनी समुद्रकिनारी धाव घेतली आणि दोघांना पाण्यातून बाहेर काढले. अमन खान आणि अर्जुन नावाच्या व्यक्तीला वाचवण्यात आले असून, आमिर खान असे बेपत्ता तरुणाचे नाव आहे.

याबाबतची माहिती मिळताच शहर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. समुद्रात पोहण्यासाठी आलेले हे तिघेही करून मूळचे बिहारमधील किशनगंज येथील असून सध्या ते रत्नागिरीत वास्तव्याला आहेत. या घटनेची माहिती त्यांच्या ठेकेदाराला देण्यात आली असून त्यानंतर त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.