कार्तिकीवारीसाठी पाच लाख भाविक पंढरपूरात दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। पंढरपूर

कार्तिकीवारीच्या महासोहळ्यासाठी विविध राज्यांमधून पाच लाखाहून अधिक भाविक पंढरपूरात दाखल झाले आहेत. दाखल झालेले भाविक चंद्रभागेत स्नान करुन देवाच्या पदस्पर्श दर्शनासाठी गर्दी करीत असून दर्शनाची रांग गोपाळपूर पत्रशेड पर्यत पोहचली आहे. एक लाखाहून अधिक भाविक रांगेत उभे असून बारा ते चौदा तास दर्शनासाठी लागत आहेत. तसेच एकादशीची शासकीय महापूजा राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे.

कार्तिक वारीच्या महासोहळ्यासाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. जास्त गर्दी असणार्‍या विठ्ठल मंदिर, चंद्रभागा वाळवंट, दर्शन रांग , पत्राशेड, प्रदक्षिणा मार्ग, रेल्वे व बसस्थानकात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रविवारी दशमी दिवशी नदीच्या पैलतिरी असणार्‍या भक्तिसागरच्या 65 एकरात भाविकांची मोठी गर्दी दिसत होती. तेथे सव्वा ते दीड लाख भाविक उतरण्याची सोय आहे.

चंद्रभागा नदीच्या वाळवंटात भाविकांची रविवारी सकाळपासून प्रचंड गर्दी होती. येथे नदीला भक्तीचा महापूर आल्याचे चित्र होते. एसटी महामंडळाच्या बाराशे बस राज्यभरातून भाविकांना येथे आणत आहेत. याच बरोबर रेल्वेने ही मिरज व लातूर भागातून जादा गाड्या सोडल्या आहेत. खासगी वाहनांची संख्या मोठी आहे. यात्रेसाठी नगरपरिषद, मंदिर समिती, पोलीस , महसूल यांच्यासह शासनाचे विभाग सज्ज आहेत. या यात्रेसाठी व्यापार्‍यांनी ही जय्यत तयारी केली आहे.

दुष्काळाचा परिणाम नाही
राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने वारकरी कार्तिकी वारीकडे पाठ फिरवतील असा कयास होता मात्र तो फोल ठरला. एकादशीच्या पूर्वसंध्येला पाच लाखांहून अधिक भाविक दाखल झाले असून उद्या पर्यत हा आकडा सात लाखपर्यत पोहचू शकतो.

सुलभ व तत्पर दर्शनासाठी वेग वाढवला
एकादशी पर्वणीवर श्री विठ्ठलाचे दर्शन मिळावे यासाठी भाविकांचा खटाटोप असतो त्यामुळे अधिक भाविकांना दर्शन मिळावे यासाठी मंदिर समिती व्यवस्थानने एका मिनिटांमध्ये 45 ते 50 भाविकांना दर्शन देण्याची व्यवस्था केली आहे.

चहा आणि अल्पोहाराची सोय
दर्शन रांगेतील भाविकांना मोफत चहा आणि अल्पोपहाराची सोय केली असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी दिली आहे.