छत्रपती संभाजी नगर, वैजापुरात तणाव, रामगिरी महाराज यांच्या विरोधात गुन्हा

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात अखंड हरिनाम सप्ताहात मुस्लिम धर्माविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी सराला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराज यांच्या विरोधात नगर, संगमनेर, येवला, वैजापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामगिरी महाराजांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मुस्लिम समाजाने ठिय्या आंदोलन केले. यामुळे काही काळ वैजापूर शहरात तणावाचे वातावरण होते. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून शहरात 19 ऑगस्टपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

रामगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्माविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे पडसाद छत्रपती संभाजीनगरातही उमटले. शुक्रवारी दुपारी शहराच्या मध्यवस्तीतील सिटी चौक पोलीस ठाण्यासमोर मुस्लिमांचा मोठा जमाव गोळा झाला. महाराजांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जमाव करत होता. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. दरम्यान, नगर शहर आणि संगमनेरात मुस्लिम तरुणांनी मोर्चा काढत चक्काजाम केला. महामार्गही रोखला.