
पनवेल महापालिकेचे महापौरपद ‘ओबीसी’ (नागरिकांचा मागास प्रवर्ग) प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने राजकीय चुरस शिगेला पोहोचली आहे. भाजपची एकहाती सत्ता असल्याने या पदासाठी ‘पाच पांडवां’ची नावे चर्चेत आहेत. महापौरपदाच्या शर्यतीत अॅड. मनोज भुजबळ, अमर पाटील, नितीन पाटील, प्रवीण पाटील आणि ममता म्हात्रे ओबीसी प्रवर्गामधून निवडून आले आहेत. भाजप अनुभवी नगरसेवकाला संधी देणार की नवा चेहरा समोर आणणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. प्रदेश पातळीवरून यावर शिक्कामोर्तब झाल्यावर आमदार प्रशांत ठाकूर महापौरपदाचे नाव जाहीर करणार आहेत.
दुसरीकडे नवी मुंबई पालिकेचे महापौरपद सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी राखीव आहे. पालिकेत भाजपला पूर्ण बहुमत मिळाले आहे. भाजप ६५, शिंदे गट ४२, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) २, मनसे १ आणि अपक्ष १ असे पक्षीय बलाबल आहे. महापौरपदासाठी वैष्णवी नाईक आणि नेत्रा शिर्के यांची नावे आघाडीवर आहेत.
वैष्णवी नाईक यांच्याबरोबरच रेखा म्हात्रे आणि शुभांगी पाटील यांच्याही नावांची चर्चा आहे. नेत्रा शिर्के आणि शुभांगी पाटील यांनी यापूर्वी स्थायी सभापतीपद सांभाळले आहे. वनमंत्री गणेश नाईक महापौरपदाबाबत कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.
महापौरपदासाठी लॉबिंग आणि फिल्डिंग; ठाणे, रायगडमधील आठ महापालिकेत सर्व समाजघटकांना समान संधी




























































