
कर्जत-पनवेल या रेल्वे मार्गाच्या डबलिंगचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. लोहमार्ग, तीन बोगदे, ४४ लहानमोठे पूल आणि १५ भुयारी मार्गिका यांचे काम सुमारे ८० टक्के पूर्ण झाले आहे. उरलेले २० टक्के काम लवकरात लवकर पूर्ण करून मार्च २०२६ पासून या मार्गावरून लोकल चालवण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाने केले आहे. प्रवासी सेवा सुरू करण्यासाठी या मार्गावर येत्या फेब्रुवारीमध्ये सीआरएसची चाचण्या होणार आहेत. हा मार्ग सुरू झाल्यानंतर कर्जत-पनवेल प्रवास सुसाट होणार असून कर्जत ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या प्रवासाचा कालावधी व्हाया पनवेलमार्गे ३० मिनिटांनी कमी होणार आहे.
कर्जत आणि पनवेल दरम्यान दुहेरी रेल्वे मार्गाच्या प्रकल्पाचे काम जानेवारी २०२१ मध्ये सुरू झाले. कोरोना महामारीमुळे सुरुवातीला या कामात अडथळा आला. मात्र नंतर या २९.६ किलोमीटर लांबीच्या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू झाले. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनने (एमआरव्हीसी) गेल्या पाच वर्षांत या प्रकल्पाचे ८० टक्के काम केले आहे. या मार्गावर पनवेल, मोहोपे, चिखले, चौक आणि कर्जत अशी पाच रेल्वे स्थानके आहेत. या सर्व स्थानकांची कामेही अंतिम टप्प्यात आहेत. ही सर्व कामे येत्या दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन एमआरव्हीसीने केले आहे. त्यानंतर या मार्गावर सीआरएसच्या माध्यमातून प्रवासी आणि मालवाहतुकीच्या विविध चाचण्या घेण्यात येणार आहे. त्यांच्या प्रमाणपत्रानंतर या मार्गावर रेल्वे वाहतूक सुरू होणार आहे.
- कर्जत-पनवेल दरम्यान दुहेरी मार्गावर रेल्वे सेवा सुरू झाल्यानंतर लोकल सेवेचा वेग वाढणार आहे. सध्या या मार्गावर प्रवासी गाड्यांची संख्या कमी आहे. मालवाहतूक करणाऱ्या गाड्या मोठ्या प्रमाणात चालवल्या जातात.
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कर्जत या प्रवासासाठी जलद लोकलने दोन तासांचा तर धीम्या लोकलने अडीच तासांचा कालावधी लागतो. कर्जत-पनवेल दुहेरी मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांनी जर व्हाया पनवेल असा प्रवास केला तर ३० मिनिटांचा प्रवास कमी होणार आहे.
- कर्जत-पनवेल दुहेरी रेल्वे मार्ग हा प्रकल्प २ हजार ७८२ कोटी रुपये खर्चाचा आहे. या मार्गावर २९.६ किलोमीटरच्या लोहमार्गाबरोबर एका उड्डाणपुलाचाही समावेश आहे. या उड्डाणपुलावर गर्डर टाकण्याचे कामही पूर्ण झाले आहे.
उपनगरीय रेल्वे सेवेत सर्वात लांब बोगदा
कर्जत-पनवेल रेल्वे मार्गावर एमआरव्हीसीने वावर्ले, नढाल आणि किरवली असे तीन बोगदे तयार केले आहेत. त्यापैकी वावर्ले बोगद्याची लांबी ही २ हजार २६५ मीटर इतकी आहे. हा बोगदा मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेत सर्वात मोठा ठरला आहे. यापूर्वी मध्य रेल्वेच्या ठाणे आणि दिवा स्थानकादरम्यान असलेल्या पारसिक बोगदा सर्वाधिक लांब म्हणून ओळखला जात होता. या बोगद्याची लांबी १ हजार ३०० मीटर आहे. कर्जत-पनवेल मार्गावरील नढाल बोगद्याची लांबी २१९ मीटर तर किरवली बोगद्याची लांबी ३०० मीटर इतकी आहे.




























































