
रद्द करा.. रद्द करा.. मालमत्ता कर रद्द करा अशा घोषणांनी आज पनवेल महानगरपालिकेची पहिलीच महासभा शिवसेनेसह विरोधी पक्षांनी दणाणून सोडली. मालमत्ता रद्द करा, अशा घोषणांचे फलक गळ्यात अडकवून शिवसेनेचे नगरसेवक महापालिका सभागृहाच्या ‘वेल’मध्ये उतरले. दरम्यान, पुढील महासभेत मालमत्ता कराचा विषय चर्चेसाठी आणावा अशी आग्रहाची मागणी विरोधकांनी महापौर नितीन पाटील यांच्याकडे केली आहे.
सिडको कॉलनी भागात राहणाऱ्या लाखो नागरिकांवर मालमत्ता कर लादण्यात आला असून तो अन्यायकारक असल्याचा दावा विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी केला आहे. मालमत्ताधारकांना अवाजवी कर भरावा लागत असून कायद्यानुसार मिळणारी सवलतही देण्यात आलेली नाही. मालमत्ता कर रद्द करावा यासाठी अनेकांनी न्यायालयाचे दरवाजेदेखील ठोठावले आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नगरसेवक व पदाधिकारी यांनीही गेली पाच वर्षे याबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा केला. सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात होताच शिवसेनेचे गटनेते लीना गरड, मेघना घाडगे, प्रिया गोवारी, उत्तम मोर्बेकर, रितिशा गोवारी, महाविकास आघाडीच्या प्रगती पाटील, आर्या जाधव, अरविंद म्हात्रे, लतिफ शेख, हरेश केणी आदी नगरसेवकांनी फलक झळकावले. त्यावर मालमत्ता कर रद्द करा, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव कधी देणार, असा सवाल करून सर्वांचे लक्ष वेधले.
मनमानी कारभाराविरोधात न्यायालयात याचिका
आज झालेल्या महासभेत प्रथेनुसार विरोधी पक्षनेते व सभागृह नेते यांची निवड होणे अपेक्षित होते, पण प्रत्यक्षात ही निवड झालीच नाही. सत्ताधाऱ्यांच्या या मनमानीविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असल्याची माहिती महाविकास आघाडीचे नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी दिली.
शिवसेनेच्या या नगरसेवकांची समित्यांवर निवड
पनवेल महानगरपालिका स्थायी समितीच्या १६ सदस्यांची निवड आज महासभेत जाहीर करण्यात आली. त्यात शिवसेनेच्या नगरसेविका प्रिया गोवारी यांची निवड करण्यात आली. महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यपदी शिवसेनेच्या मेघना घाडगे यांची निवड झाली आहे, तर स्वीकृत नगरसेवकपदावर शिवसेनेचे नितीन गावंड यांची निवड झाली असून या सर्वांचे उपनेते बाळ माने, सहसंपर्कप्रमुख अनिल चव्हाण, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, भरत पाटील, कैलास पाटील यांनी अभिनंदन केले आहे.


























































