भ्रष्ट कंत्राटदारावर कारवाई करा; बॅरिकेड्स तोडून महापालिकेवर धडक, पनवेलच्या खड्डेमुक्तीसाठी शिवसैनिक आक्रमक

ठिकठिकाणी पडलेल्या खड्यांनी पनवेलकर हैराण झाले असून निकृष्ट दर्जामुळे रस्त्यावरून चालताना मोठी कसरत करावी लागत आहे. वारंवार अर्ज-विनंत्या करूनही प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने आज अखेर असंख्य शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेत महापालिका मुख्यालयावर धडक दिली. भ्रष्ट कंत्राटदारावर कठोर कारवाई करा.. पनवेल शहर खड्डेमुक्त करा.. अशा गगनभेदी घोषणा देत बॅरिकेड्स तोडून शिवसैनिकांनी पालिकेत प्रवेश केला आणि संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला.

मोर्चाचे आयोजन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे महानगरप्रमुख अवचित राऊत यांच्या पुढाकाराने करण्यात आले. यावेळी शिवसेना विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, महानगर समन्वयक दीपक घरत, संघटक गुरुनाथ पाटील, तालुकाप्रमुख संदीप तांडेल, उपमहानगरप्रमुख प्रकाश गायकवाड, युवासेनेचे पराग मोहिते, शहरप्रमुख प्रवीण जाधव, सदानंद शिर्के, प्रदीप केणी, गुरू म्हात्रे, रामदास गोवारी, सूर्यकांत म्हसकर, यतीन देशमुख, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष मुस्सादीप मोडक, महिला आघाडीच्या प्रेमा अप्पाचा, रुपाली कवळे, अर्चना कुळकर्णी, संपदा धोंगडे, उज्ज्वला गावडे, सानिका मोरे, श्रद्धा कदम, ज्योती मोहिते, समीक्षा पांगम, युवासेना प्रभारी विधानसभा अधिकारी अजय पाटील, महानगर अधिकारी महेश भिसे, जीवन पाटील, निखिल भगत, जितेंद्र सिद्धू, निखिल पानमंद, खांदा कॉलनी शहर अधिकारी आबेश ओंबळे, पनवेल शहर चिटणीस साईसूरज पवार उपस्थित होते.

कारवाईचे आश्वासन

महापालिका प्रशासनाला जाब विचारण्यासाठी गेलेल्या शिवसैनिकांना सुरक्षारक्षकांनी अडवण्याचा प्रयत्न केला, पण संतप्त शिलेदारांनी बॅरिकेड्सची ऐशी की तैशी करून थेट मुख्यालयात घुसून आयुक्त मंगेश चितळे यांची भेट घेतली. तसेच निवेदनही दिले. शिवसेनेच्या शिष्टमंडळाबरोबर केलेल्या चर्चेनंतर रस्त्यांच्या कामाची तपासणी करण्याचे आदेश दिले. तसेच दोषी भ्रष्ट ठेकेदार व जबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यास सांगितले. गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती पूर्ण करा, असे मंगेश चितळे यांनी अधिकाऱ्यांना बजावले.