
>> पराग खोत
‘स्टँडअप टॉक शो’ हा नाटय़ प्रकार मराठी रंगभूमीला अजिबातच नवा नाही. अनेक दिग्गज मंडळींनी तो सादर करून त्याला मानाचे पान दिले आहे. मूलत विनोद हा त्यांचा स्थायिभाव असला तरी क्वचित ‘या कातरवेळी’सारखा एखादा गंभीर एकपात्री प्रयोगही सादर केला गेलाय. शिरीष कणेकरांसारख्या मुरलेल्या स्टँडअप कलावंताने हा अभिनव प्रयोग केला होता, पण त्यांनी त्याचे प्रयोग भारतात केले नाहीत. हिंदी आणि इंग्रजीतही याची खूप मोठी परंपरा आहे. कमी जागेत, कमी वेळेत, नेपथ्य नसेल तरीही आणि मोजक्याच प्रेक्षकांच्या उपस्थितीत सादर करता येणारा हा सुटसुटीत कला प्रकार आहे. तशातच सध्या बोकाळलेल्या वादग्रस्त विषयांनी आणि काही वाह्यात स्टँडअप कॉमेडियन्सनी कामेडीच्या नावाला कलंक लावला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मराठी रंगमंचावर अवतरलेला ‘सम्या सम्या मैफिलीत माझ्या’ हा पूर्ण लांबीचा, निखळ आनंद देणारा आणि हसता हसता खुर्चीतून पडायला लावणारा हास्यस्फोट अपेक्षा वाढवणारा आहे.
सामान्य मध्यमवर्गीय माणसाच्या रोजच्या जगण्यातले संदर्भ वापरून पौगंडावस्थेतील प्रेमापासून ते लग्नापर्यंत आणि त्यानंतर … असा प्रवास उलगडत नेताना मध्यमवर्गीयांच्या आयुष्यात घडणाऱया अनेक छोटय़ा छोटय़ा घटनांचा हलकाफुलका वेध घेणारं आणि त्यातला विनोद उलगडून दाखवणारं हे एकपात्री प्रहसन आहे. त्यातले बारकावे micro level आहेत आणि ते जाणून घेणं म्हणजे आपल्याच अंतरंगात डोकावणं आहे. प्रेम, प्रेमभंग आणि पुन्हा प्रेम, प्रेमाचा अनुनय, लग्नाला नकार किंवा होकार, लग्नपूर्व तयारी, प्रत्यक्ष लग्न आणि लग्नानंतर … असा सगळा प्रवास घडत असताना उद्भवणारे अनेक प्रसंग, घटना आणि परिस्थितीचे हे हास्योत्पादक सादरीकरण आहे. क्षणाचीही उसंत न देता आपल्यावर एकामागून एक असे आदळणारे हे आपल्याच आयुष्यात घडून गेलेले प्रसंग आपल्याला त्याची जाणीव करून देतात. आपल्या अवतीभवती घडत असलेल्या घटनांचं इतकं सखोल निरीक्षण आणि त्यांचं विनोदी विश्लेषण आपल्याला जवळपास कोंडीत पकडतं. You caught me unaware असं म्हणण्यावाचून आपल्याला पर्यायच उरत नाही. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात हे असंच घडतं. आपण हे हसत हसत आणि क्वचितप्रसंगी गडबडा लोळत मान्य करतो आणि हेच या कार्यक्रमाचं यश म्हणता येईल.
समीर चौघुले या अत्यंत अनुभवी आणि यशस्वी कलावंताने हा सगळा खेळ मांडला आहे. त्याची तीस वर्षांची प्रदीर्घ अभिनय कारकीर्द, लेखक म्हणून त्याचा ‘हास्यजत्रे’चा अनुभव आणि त्याच्या खडतर प्रवासातून आलेली अचूक निरीक्षणशक्ती या जोरावर तो हा प्रयोग उभा करतो. स्वतवर विनोद करण्यासाठी लागणारे धैर्य त्याच्याकडे आहेच, पण तेच विनोद स्वतसोबत त्याने आपल्यावर केले आहेत हे जाणवून देण्याची त्याची हातोटी अजब आहे. हे सर्व जमवताना त्याच्या अफाट परिश्रमांची कल्पना येते. ‘सम्या सम्या मैफिलीत माझ्या’मधला विनोद ताजा आहे, निर्विष आहे आणि मुख्य म्हणजे ‘हास्यजत्रे’च्या विनोदापासून फारकत घेतलेला आहे. पुलंच्या ‘असा मी असामी’सारखा अचंबित करणारी निरीक्षणं नोंदवणारा किंवा कणेकरी शैलीतला तिरकस ब्लॅक ह्युमर या पठडीतला आहे. तो एकदाही Below the Belt जात नाही हे त्या विनोदाचं वैशिष्टय़ म्हणता येईल, पण तरीही त्यातल्या काही गोष्टी अनावश्यक वाटतात आणि त्या टाळता आल्या तर प्रयोग अजून ठाशीव करता येईल असं आपल्याला वाटत राहतं. त्या कोणत्या ते ज्याचं त्याने ठरवावं.
गद्य सादरीकरणाबरोबरच समीरने सादर केलेली गाणी छान झाली आहेत. ती सुरात आहेत आणि आपल्या गायकीच्या मर्यांदांचं भान राखून तो गाणी पेश करतो आणि त्यांना वन्समोअरही मिळतो. समीरची भाषा, उच्चार आणि त्याने पकडलेला टोन प्रेक्षकांना आवडणारा आहे. आपल्या संभाव्य चुका समजावून सांगणारा जिवलग आणि आपल्या चुकांवर आपल्याला टपल्या मारणारा हवाहवासा मित्र अशा भूमिकांतून तो प्रेक्षकांच्या मनात शिरतो आणि काळजात घर करून राहतो. त्याची एनर्जी अफाट आहे, हजरजबाबीपणा विलक्षण आहे. क्रिप्टबाहेरच्या त्याच्या अॅडिशन्स जाणवतात आणि प्रेक्षकही त्याला दिलखुलास दाद देतात. अडीच-तीन तास सतत बोलत, गात, रंगभूमीवर वावरत राहणं हे येरागबाळ्याचं काम नाही हे जाणवून देणारा हा अजून एक कार्यक्रम आहे. चार्ली चॅप्लिन या त्याच्या देवाप्रमाणेच समीर विनम्र आहे आणि हीच गोष्ट त्याचं मोठेपण अधोरेखित करणारी आहे. संपूर्ण प्रयोगात जाणवणाऱया त्याच्या अवखळपणाच्या आत दडलेली ही विनम्रता प्रेक्षकांना त्याच्या सोबत जोडून ठेवते.
‘सम्या सम्या मैफिलीत माझ्या’ या नाटकाचे देशविदेशात प्रयोग झाले आहेत, पण कार्यबहुलतेमुळे त्याचे सतत प्रयोग करणं समीरला शक्य होत नसावं असं दिसतं. तरीही वेळात वेळ काढून समीरने त्याचे प्रयोग करावेत अशी इच्छा आहे. आजवर मराठी, हिंदी रंगभूमीवर अनेक नाटकांचे असंख्य प्रयोग करणाऱया समीर चौघुलेच्या ‘सम्या सम्या मैफिलीत माझ्या’ या एकपात्री कार्यक्रमाचेही असंख्य प्रयोग होवोत या शुभेच्छा!… आणि हो, तुमच्या जवळपास याचा प्रयोग असेल तर तो चुकूनही चुकवू नका, नाहीतर तुम्ही आयुष्यातल्या एका मोठय़ा आनंदाला मुकाल. आता आयुष्यात स्थिरस्थावर झाल्यावर आपल्या उमेदवारीच्या काळात आपण कसे बावळट होतो, ते पाहून आपल्याशीच ती कबुली देण्याची ही संधी समीरने दिली आहे आणि तीसुद्धा हसत हसत. ती आपण सोडू नये. आपल्या आजच्या मराठीत सांगायचं म्हणजे हा एक ‘मस्ट वॉच’ प्रयोग आहे.