
>>पराग खोत
आजचा काळ अतिसंवेदनशीलतेचा आहे. संयम कमी होत चाललाय, प्रतिक्रिया झटपट उमटतात आणि मतभेद सहज संघर्षात बदलतात. काही प्रश्न तर थेट अस्मितेच्या पातळीवर येऊन ठेपतात. अशा वातावरणात एखादा गंभीर विषय त्याच्या दोन्ही बाजू समजून घेऊन मांडणं हे धाडसाचं काम असतं. ‘भूमिका’ हे नाटक हे धाडस समर्थपणे पेलतं आणि म्हणूनच ते आजच्या काळातलं समंजस व महत्त्वाचं नाटक ठरतं.
नाटय़ आणि दूरदर्शन या दोन्ही क्षेत्रांत कार्यरत असलेला अभिनेता विवेक जयंत नव्या कामाच्या शोधात आहे. अशातच एका नव्या मालिकेसाठी एका महान व्यक्तिमत्त्वाची स्वप्नवत भूमिका त्याच्याकडे चालून येते आणि त्याच्या कामाचा भाग म्हणून तो ती स्वीकारतो. मात्र जसजसा तो त्या भूमिकेचा अभ्यास करू लागतो तशा गोष्टी बदलू लागतात. ही भूमिका त्याच्या अस्तित्वालाच आव्हान देणारी ठरते. पात्राच्या अंतरंगात शिरत जाऊन तो त्या भूमिकेत इतका रंगून जातो की, माणूस म्हणूनही तो हळूहळू बदलू लागतो. त्याची पत्नी उल्का, मुलगी कुहू आणि सभोवतालचा समाज सर्वांनाच तो पूर्वीसारखा राहिलेला नाही, असे जाणवू लागते. याच बदलातून त्याच्या आयुष्यात संघर्षाची आणि गुंतागुंतीच्या वाटेची सुरुवात होते. विवेकच्या आयुष्यात घडणारी ही नाटय़मय रसायनक्रिया म्हणजेच ‘भूमिका’ हे नाटक आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाने शोषितांच्या उन्नतीसाठी मांडलेल्या आरक्षणाच्या मुद्दय़ाचे आताचे स्वरुप आणि त्याच्या प्रभावामुळे काही घटकांवर होणारा अन्याय याचे वैचारिक विश्लेषण हा या नाटकाचा विषय. विवेक जयंतच्या घरी पत्नी उल्का, मुलगी कुहू असे छान कुटुंब आहे. त्याचा गुंडयामामा अधूनमधून येऊन जाऊन आहे. शांताबाई या घरकाम करणाऱ्या बाई त्यांच्या कुटुंबाचाच एक भाग आहेत. मात्र मेडिकलला प्रवेश न मिळण्याच्या एका घटनेने या कुटुंबात खळबळ उडते. प्रत्येक जण आपापल्या भूमिकेत शिरतो आणि एकाच वेळी कुटुंबकर्त्याची आणि सिरियलमधल्या नटाची भूमिका साकारणाऱ्या विवेकची कुचंबणा होते. सगळेच आपापल्या ठिकाणी बरोबर आहेत हे दिसत असताना गोंधळलेला विवेक कोणाची बाजू घेतो? ती बरोबर असते का? त्या कुटुंबातील तो तिढा सुटतो का? या सगळ्या उत्पंठावर्धक प्रश्नांचे तर्कशुद्ध उत्तर म्हणजे ते नाटक.
कुठल्याही एका बाजूचे समर्थन न करता दोन्ही बाजूंनी वाद-प्रतिवाद करत हा प्रश्न हाताळला आहे. त्या नाटकातील पात्रे खरीखुरी वाटतात आणि ती खऱ्या आयुष्यातल्यासारखीच वागतात. त्यांचा राग, लोभ, घुसमट आणि व्यक्त होणे हे नैसर्गिक आहे. प्रत्येक पात्राची आपली एक भूमिका आहे आणि ते आपल्या भूमिकेवर ठाम राहतं. तरीही एका सुसंगत आणि समाधानकारक शेवटाकडे हे नाटक प्रेक्षकांना घेऊन येते व हे त्या नाटकाच्या लेखनाचे यश आहे. लेखक क्षितिज पटवर्धन यांनी तीन वर्षांच्या परिश्रमानंतर ही संहिता तयार केलीय आणि म्हणूनच ती इतकी परिणामकारक झाली आहे. दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी नाटककाराचा तो विचार अधिक समृद्ध केलाय. गंभीर विषयावरील नाटके हाताळण्याचे त्यांचे काwशल्य पुन्हा एकदा सिद्ध होते.
सचिन खेडेकर यांचा अभिनय हा या नाटकाचा कणा आहे. सूक्ष्म भावछटा, संयत संवादफेक आणि देहबोलीतून उमटणारा अंतर्गत संघर्ष त्यांनी प्रभावीपणे साकारला आहे. विवेकचा हा प्रवास केवळ एका अभिनेत्याची कहाणी न राहता स्वतःची ओळख शोधणाऱ्या प्रत्येक माणसाचा अंतर्मुख प्रवास होतो. त्यांना समिधा गुरू यांनी तितकीच समर्थ साथ दिलीय. घुसमट असह्य झाल्यानंतरचा त्यांचा उद्रेक अवर्णनीय. कुहूचं निरागस बागडणं, गुंडयामामांची वैचारिक बैठक आणि शांताबाईंची कृतज्ञता ही सहजपणे नाटकात मिसळून जाते. एका विद्रोही वर्गाचा प्रतिनिधी म्हणून सोमनाथ शोभून दिसतो. सर्वच कलाकारांकडून दिग्दर्शकाने चोख कामे काढून घेतली आहेत. नेपथ्य प्रशस्त आणि अनुरुप आहे. प्रकाशयोजनेमुळे नाटक अधिक प्रभावी झाले आहे.
‘भूमिका’ हे नाटक म्हणजे अभिनय, अस्तित्व आणि नातेसंबंध यांच्यातील नाजूक सीमारेषांवर केलेलं सखोल भाष्य आहे. रंगभूमीवर घडणारी ही नाटय़मय रसायनक्रिया प्रेक्षकाला विचार करायला लावते आणि प्रयोग संपल्यानंतरही बराच काळ मनात रेंगाळत राहते. आज एकांगी विचार करणाऱ्या सगळ्यांनाच नाण्याची दुसरी बाजू दाखवत, तर्कशुद्ध विचारांनी प्रश्नांची उत्तरे शोधायला हवीत असा विचार देणारे हे दमदार नाटक आहे. एक नाटय़रसिक म्हणून, एक माणूस म्हणून आणि त्याही पुढे जाऊन भारतीय प्रजासत्ताकाचा एक जागरूक नागरिक म्हणून प्रत्येकाने हे नाटक अवश्य पाहायला हवे.
n लेखक ः क्षितिज पटवर्धन
n दिग्दर्शक ः चंद्रकांत कुलकर्णी
n कलाकार ः समिधा गुरू, अतुल महाजन, सुयश झुंजूरके, जयश्री जगताप, जाई खांडेकर आणि सचिन खेडेकर
n नेपथ्य ः प्रदीप मुळ्ये
n संगीत ः अशोक पत्की
n सूत्रधार ः प्रणित बोडके
n निर्माते ः श्रीपाद पद्माकर,दिलीप जाधव


























































