परळीत जमीन खरेदी विक्रीची नोंदणी रखडली

परळीत जमीन खरेदी विक्री करणाऱ्या ग्राहकांना जमीन नावावर होण्यासाठी महिनाभर वाट पाहावी लागत आहे. येथील दुय्यम निबंधक कार्यालयाचे काम बंद कनेक्टीव्हीटीच्या फेऱ्यात अडकल्याने काम रखडल्याचे दिसून येत आहे. यामुळे खरेदी विक्री नोंदणीच्या कामासाठी रजिस्टर ऑफीसचे उंबरे झिजवावे लागत आहेत.

राज्य शासनाच्या तिजोरीत मुद्रांक आणि नोंदणी शुल्काच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात महसुल जमा होत असतो. परळी येथील दुय्यम निबंधक कार्यालयातही खरेदी विक्री नोंदणीचा आकडा मोठा आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून येथील कामकाज कनेक्टीव्हीटी बंद असल्यामुळे रखडत असून याचा फटका जमीन खरेदीदारांना बसत आहे. वारंवार रजिस्टर ऑफीसमध्ये चकरा मारूनही कामे होत नसल्याने, ही ससेहोलपट थांबणार कधी असा प्रश्न विचारला जात आहे.

ज्या खरेदीसाठी पक्षकार पैसे देत नाहीत त्या खरेदीखत दस्त नोंदणी साठी कनेक्टिव्हिटी बंद आहे,पंधरा दिवसांनी नंबर येईल, महिन्याने या अशी उडवाउडवीची उत्तर दिले जात असल्याचा आरोप होत आहे. कनेक्टिव्हिटी बंद बाबत माहिती विचारली असता कार्यालयातुन समाधानकारक उत्तर भेटत नसल्याने रहिवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

दलालांचा धंदा तेजीत

रजिस्टर ऑफीसचे काम वारंवार येऊनही पूर्ण होत नसल्याने खरेदीदारांनी दलालांमार्पâत काम करून घेण्याचा मार्ग पत्करला आहे. दलालांमार्फत होणारे व्यवहार नित्यनियमाने सुरू असल्यामुळे त्यांचा धंदा तेजीत असल्याचे दिसून येत आहे.

दुय्यम निबंधकांची चौकशी होणार

जमिन दस्त नोंदणीचे नियम पायदळी तुडवून नोंदणी होत असल्याची तक्रार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. दुय्यम निबंधक यांची चौकशी करण्यासाठी बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी नुकतीच अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमुन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या