परळीत महाशिवरात्री उत्सवाची वैद्यनाथ मंदिरात लगबग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असणाऱ्या बीड जिल्ह्यातील परळीच्या वैद्यनाथ मंदिरात महाशिवरात्री उत्सवासाठी तयारी सुरू झाली आहे. महाशिवरात्रीच्या पावन पर्वात प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येत असतात. या भाविकांच्या दर्शनासाठी तयारी सुरू असून यामध्ये रंगरंगोटी, पेंडॉल, बॅरिकेटिंग टाकण्याचे काम सुरू आहे. मंदिराचे सुशोभिकरण केले जात आहे.

21 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री पर्व असणार आहे. यासाठी लाखो शिवभक्त वैद्यनाथाच्या दर्शनासाठी दाखल होत असतात. यानिमित्त वर्षभरातून एकदा येणाऱ्या महाशिवरात्र उत्सवाची मंदिर प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू असून मंदिर परिसरात हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. देवस्थान ट्रस्टकडून मंडप उभारणीला सुरुवात झाली आहे. तसेच मंदिराला आकर्षक रंगरंगोटी करण्यात येत आहे. महाशिवरात्रीला 12 दिवस राहिले असताना तयारीची लगबग मंदिर परिसरात दिसत आहे. मंदिर प्रशासन वैद्यनाथाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकाला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची काळजी घेताना दिसून येत आहे.