परळीत चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिलेचा मृतदेह सापडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परळीतील वडसावित्रीनगर भागातील रहिवासी असलेल्या महिलेचा मृतदेह याच भागातील एका विहीरीत आढळला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. चार दिवसांपासून ही महिला बेपत्ता होती. दरम्यान ही आत्महत्या की घातपात हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परळी शहरातील वडसावित्रीनगर या भागातील विवाहित महिला 19 जून रोजी घरातून बेपत्ता असल्याची नोंद शहर पोलीसांकडे करण्यात आली होती. कोमल सोमनाथ पडुळकर असे या मयत महिलेचे नाव आहे. 19 जून रोजी ही महिला पहाटे 6 वाजता सुमारास सडा टाकण्यासाठी शेण घेउन येते म्हणून घराबाहेर पडली होती, ती परत घरी आलीच नाही. कुटुंबियांनी शोधाशोध केली पण शोध लागला नाही. त्यामुळे शहर पोलिस ठाण्यात महिला बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली.

या महिलेचा सात महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. दरम्यान महिलेचा वडसावित्रीनगर भागातील एका विहीरीत मृतदेह तरंगताना आढळून आला. शहर पोलीसांनी आज घटनास्थळी जाऊन मृतदेहाची ओळख पटवून उत्तरीय तपासणीसाठी व उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.याप्रकरणी मयत महिलेच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस जमादार गोविंद बडे हे करीत आहेत.