मतदारसंघातील विकास कामेच मला निवडून आणतील -आमदार डॉ. राहुल पाटील

623

परभणी विधानसभा मतदारसंघातील विविध रस्त्यांची कामे, पिंगळगड नाला विकास कार्यक्रम, त्यातून झालेले शेकडो एकरवरील जलसंधारण, सिमेंट बंधारे, गावागावातील अंतर्गत रस्त्यांची कामे, नाट्य कलांतांची वर्षानुवर्ष रखडलेले नाटय मंदिर, महाआरोग्य शिबिर आणि गरजुंवर मुंबईत मोफत उपचार, अपंगांना साहित्याचे वाटप, बेरोजगांरासाठी बहुराष्ट्रीय वंâपन्यांचे शिबिर, एलबीटी, सौर उर्जेवर चालणारी आशिया खंडातील पहिली खास महिलांसाठी जय भवानी सुतगिरणी, ७०/३० टक्के आरक्षणासाठी मंत्रालयात उपोषण, बचतगटांच्या सहाय्यासाठी पतसंस्था, एअर पोर्टच्या धर्तीवर परभणीत बसपोर्ट, दुधना सिंचन प्रकल्पासाठी ५५० कोटीं, जिल्हा ग्रंथालयाची अद्यावत उभारणी, ‘आमदार आपल्या दारी’ या उपक्रम आदी विविध विकास कामेच मला निवडूण आणतील, असा विश्वास शिवसेनेचे आमदार तथा परभणी विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार डॉ. राहुल पाटील यांनी आज येथे व्यक्त केला.

ग्रामीण भागात प्रचाराला जाण्यापूर्वी शिवसेना-भाजप, रिपाई आदी महायुतीचे उमेदवार डॉ. राहुल पाटील यांनी परभणीच्या मागील पाच वर्षातील विकासाची कामे आणि येणारी पाच वर्षातील विकासाचा आरखडा मांडला. विकासाच्या मुद्यांवरच आपण जनतेसमोर जाणार असून गेल्या पाच वर्षात केलेली कामे जनतेसमोर ठेवणार आहोत. तसेच आगामी काळात ‘रोजगार युक्त परभणी, बेरोजगार मुक्त परभणी’असा आपला नारा असेल. नाराच नव्हे तर संकल्प असून तो पूर्णत्वास नेल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा निर्धारही शिवसेना आमदार डॉ. राहुल पाटील यांनी व्यक्त केला.

परभणी विधानसभा मतदार संघाचा चौफेर विकास व्हावा यासाठी आणि आदर्श मतदार संघ करण्यासाठी विविध विकास कामे केली आहेत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत केवळ जनतेचीच कामे असतात. नागरिक कामे घेऊन येतात आणि आपण त्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करतो. ते काम मार्गी लागल्या शिवाय आपणास चैन पडत नाही. ज्या पद्धतीने ते काम होईल, ती पद्धत आपण वापरतो. कधीही कुणाशी आरे…रावीने वागत नाही. यामुळेच तळागाळातील सर्वसामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक, तरुणवर्ग, महिला आदी समाजातील सर्वच स्तरातील जनता जनार्दन कामे घेवून अपेक्षेने आपल्याकडे येतात. ती आपण संधी समजतो. समोरच्या व्यक्तीचा सन्मान राखून आपल्या कार्यकत्र्यांची कामे करवून घेतो. दिवसभर हे चालते. मला याची सवय झाली आहे. परभणी शहरातील एकूण १४९ सर्व्हे नंबरचा प्रश्न प्राधान्याने सोडविला. त्यामुळे या सर्व्हे नंबरचे फेरफार होण्यास सुरूवात झाली असून त्यामुळे नागरिकांचा मोठा प्रश्न सुटला आहे. त्यासोबतच व्यापाऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचा असलेला एलबीटीचा प्रश्न मार्गी लावला. त्यामुळे व्यापाऱ्यांमधूनही समाधानाची भावना व्यक्त होत आहे.

शेतकऱ्यांचे काही प्रश्न प्रलंबित आहेत हे मान्य करावे लागेल. तसेच परभणीला वैद्यकीय महाविद्यालय मिळावे, यासाठीचे आपले प्रयत्न काही कमी नाहीत. ते अजुनही चालूच आहेत. परंतु आपण आपल्याकडून जेवढे प्रश्न सोडविता येतील तेवढे प्रश्न सोडविले आहेत. अनेक गावात शेत रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावला आहे. शेती सिंचनाचा टक्का वाढला आहे. शेतकऱ्याने उत्पादित केलेल्या मालाचे चिज व्हावे, त्याला चांगला भाव मिळावा यासाठी अन्नप्रक्रिया उद्योग, फूड इंडस्ट्रीज आणण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे आमदार डॉ. पाटील म्हणाले.

गेल्या पाच वर्षात केलेल्या विविध विकास कामे जनतेसमोर ठेवली जातील. विकासाच्या मुद्यांवर निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. युती सरकारचा कारभार हा पारदर्शक राहिला आहे. विकासाच्या अनेक योजना राबविल्या गेल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी सन्मान योजना असेल, पाच लाख रूपयांपर्यंत आरोग्य विमा असलेली आयुष्यमान भारत योजना असेल, प्रधानमंत्री आवास योजना असेल, उज्ज्वला गॅस योजना असेल आदी जनकल्याणाच्या योजना सरकारने यशस्वीपणे राबविल्या आहेत. मतदार संघातील जनतेला याचा चांगला फायदा मिळाला आहे. त्यामुळे साहजिकच हे सर्व जनतेच्या समोर आहे.

रस्त्याच्या प्रश्नांबाबत बोलताना आमदार डॉ. पाटील म्हणाले की, प्रामुख्याने ग्रामीण भागातील रस्त्याची कामे १०० टक्के पूर्ण केली आहेत. त्याचबरोबर लोअर दुधना सिंचन प्रकल्पासाठी साडेपाचशे कोटी रूपये आणले असून हे काम अंतिम टप्प्यात आहे. पिंगळगड नदीच्या खोलीकरणाचे व रूंदीकरणाचे काम करून या नाल्यावर बंधाऱ्याचे काम झाले. यामुळे हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. परभणीला सांस्कृतिक चळवळीची नगरी म्हणून संबोधले जाते. ही चळवळ पुढे जोमाने नेण्यासाठी शहरात अद्यावत नाट्यगृहाची आवश्यकता होती. त्यासाठी जुन्या बचतभवनाच्या जागेवर भव्य सुसज्य असे नाट्यगृह उभारणीस प्रारंभ झाला आहे. तसेच एअर पोर्टच्या धर्तीवर जिल्ह्याच्या ठिकाणी परभणी बसपोर्टसाठी मंजूर मिळवली असून हे काम प्रगतीपथावर आहे. शहरात अद्यावत असे ग्रंथालय उभारले आहे. त्याचबरोबर शहरातील राजगोपालाचारी उद्यान व वनामकृविच्या परिसरात खुली व्यायामशाळा सुरू केली आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. राज्यातील पहिली महिला सूतगिरणी मतदार संघातील एरंडेश्वर शिवारात होत असून यातून साडेतीन हजार महिलांना रोजगार उपलब्ध होणार आहे. संपूर्णत: सौरऊर्जेवर चालणारी ही पहिलीच सूतगिरणी असणार आहे. यात १०० कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे, असेही आमदार डॉ. पाटील यांनी सांगीतले.

परभणीकर जनतेच्या मनात कार्यसम्राट म्हणून ओळख निर्माण झालेले आमदार डॉ. पाटील म्हणाले, जनतेच्या आरोग्याचा प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे महाआरोग्य शिबिर घेण्यात आले असून याचा १ लाख रूग्णांनी लाभ घेतला. तसेच शस्त्रक्रियेसाठी गरजूंना मुंबई येथे पाठवून यशस्वी नि:शुल्क शस्त्रक्रिया करवून आणल्या. महिला बचतगटांना पतपुवठा करता यावा यासाठी पतसंस्था स्थापन करून त्यांना राष्ट्रीयकृत बँकेपेक्षा एक टक्का कमी दराने सुलभ हप्त्यात कर्ज उपलब्ध करून दिले आहे. महिला बचतगटांना भांडवलासह त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी शहरातील अनुसया टॉकीज परिसरात एक एकर जागेवर कॉम्प्लेक्स बांधून बचतगटांच्या महिलांसाठी पॅकेजिंग इंडस्ट्रीज उभारण्यात येणार आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे उपकेंद्र परभणीत आणून शिक्षणाची सोय केली आहे. ‘आमदार आपल्या दारी’ हा उपक्रम राबवून रेशनकार्ड, स्मार्टकार्ड, आधारकार्ड, संजय गांधी निराधार योजना, रमाई घरकूल योजना आदी शासकीय योजनाचा सुमारे २० हजार नागरिकांना लाभ मिळवून दिला आहे. बेरोजगार मेळावा घेवून युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. एवढेच नाहीतर अपंगांसाठी मेळावा घेवून त्यांच्यासाठी मोफत स्वंयचलित तीन चाकी सायकलींचे वाटप करण्यात आले. त्यामुळे ते स्वयंपूर्ण बनले आहेत.

 

आपली प्रतिक्रिया द्या