
कोरोना विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाउन लागू आहे. अत्यावश्यक सेवा वगळता, कोणत्याही नागरिकांनी घराबाहेर पडू नये, यासाठी प्रशासन मागील अनेक दिवसापासून खबरदारी घेत आहे. मात्र यापुढे विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांच्या विरोधात प्रशासन कठोर कारवाई करणार आहे. एवढेच नव्हे तर दुचाकी व चारचाकी वाहनावर विनाकारण फिरत असतील वाहन जप्त करून, संबंधित व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी यांनी, आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत शुक्रवार 17 एप्रिल रोजी दिले आहेत.
येथील नूतन महाविद्यालयाच्या सभागृहात शुक्रवारी दुपारी तालुकास्तरावरील आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी तहसीलदार बालाजी शेवाळे, पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय हरबडे, तालुका आरोग्य अधिकारी आर. एम. सोनवणे, गट विकास अधिकारी विष्णू मोरे, गट शिक्षणाधिकारी गणराज येरमाळ,लीड बॅंकेचे सुनील हाट्टेकर, नायब तहसीलदार प्रशांत थारकर, मंडळाधिकारी मुकुंद आष्टीकर, आदीसह रेल्वे, बँक व इतर तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.
परभणी शहरात गुरुवार 16 एप्रिल रोजी कोरोना रुग्ण आढळून आल्यानंतर, परभणी जिल्ह्यातील प्रशासन सतर्क झाले आहे. त्यामुळे तहसीलदार बालाजी शेवाळे यांनी तालुकास्तरावरील सर्वच विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची तातडीची बैठक बोलावली होती. सदरील बैठकीत उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी यांनी प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना, आदेश मोडणाऱ्या नागरिकांची गय करू नका, त्याउलट त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करा. एवढेच नाही तर जिल्हा सीमा ओलांडून येणाऱ्या नागरिकांना परत पाठवा. आणि अत्यावशक काम सोडून विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांचे वाहन जप्त करून, त्यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्हा सीमा सील
परभणी जिल्ह्याला लागून जालना जिल्ह्याच्या सीमेवर नऊ गावे आहेत. मुख्य रस्त्यावर चेक पोस्ट आहेत. याशिवाय गावातील सीमा ओलांडून येणाऱ्या नागरिकांची जबाबदारी ग्रामीण संनियंत्रण समितीकडे सोपविण्यात आली आहे. 23 मार्च 2020 रोजी सरपंच यांच्या अध्यक्षतेखालील, आपत्तीव्यवस्थापन कायद्यांतर्गत ग्रामस्तरीय समितीचे गठण करण्यात आले आहे. यात पोलीस पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष, तलाठी, अंगणवाडी कार्यकर्ती, आशा सेविका, ग्रामसेवक, आदींचा समावेश आहे. जिल्हा अथवा राज्याबाहेरील नागरिक गावात येऊ नयेत, यासाठी डोळ्यात तेल घालून काम करणे, नजर चुकून गावात नवीन आलेल्या नागरिकांना 14 दिवस गावातील शाळेत विलगीकरण कक्षात ठेवणे, त्यांचा गावातील नागरिकांसोबत संपर्क येऊ नये, याची खबरदारी घेणे, त्यांची निवास व भोजनाची व्यवस्था करणे, तसेच स्वस्त धान्य दुकानातून नियमितपणे धान्य वाटप होत असताना, त्यावर करडी नजर ठेवणे, ही संपूर्ण जबाबदारी ग्रामस्तरीय समितीवर सोपविण्यात आली असून, समितीचे कामकाजाकडे दुर्लक्ष आढळून आल्यास आपत्ती व्यवस्थापन 2005 दंडविधान कलम 188 नुसार कठोर कारवाई करण्याचा इशारा उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी व तहसीलदार बालाजी शेवाळे यांनी दिला आहे.
बाहेरून येणाऱ्यांसाठी शाळा
कोरोना पार्श्वभूमीवर यापुढे संपूर्ण जिल्हा सीमा सील केलेल्या असताना देखील, गावात येणाऱ्या नागरिकांना त्यांच्या घरी न जाऊ देता, 14 दिवस शाळेतच थांबविण्याच्या सूचना प्रशासनाने दिलेल्या आहेत. त्यामुळे यापुढे बाहेरून, ग्रामीण भागात येणाऱ्यांसाठी 14 दिवस शाळेतच मुक्काम ठोकावा लागणार आहे. एवढेच नाही तर गावातील नागरिकांना भेटता देखील येणार नाही. या आदेशाचे पालन झाले नाही तर ग्रामस्तरीय समितीवर कारवाई करण्याच्या सूचना देखील उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी यांनी दिल्या आहेत.
परिसर बंद
सेलु शहरात अथवा ग्रामीण भागात रुग्ण आढळून आल्यास तो रुग्ण ज्या परिसरात वास्तव्यास आहे, तो संपूर्ण परिसर बंद करण्यात येणार आहे. तेथील नागरिकांना घराबाहेर पडता येणार नाही. त्यांना लागणारे जीवनावश्यक साहित्य, नगरपालिका अथवा ग्रामपंचायत कार्यालयामार्फत पुरविण्यात येणार आहे. तसेच त्या संपूर्ण भागातील नागरिकांची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात येणार आहे.
मुख्यालय सोडू नका
तालुकास्तरावरील सर्वच शासकीय, निमशासकीय विभागातील कार्यालय प्रमुखांनी मुख्यालयी थांबण्याच्या सूचना सदरील बैठकीत देण्यात आले आहेत. एवढेच नाही तर जे अधिकारी मुख्यालयी थांबणार नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देखील देण्यात आला आहे. त्यामुळे तालुकास्तरावरील सर्व अधिकाऱ्यांना यापुढे मुख्यालय सोडता येणार नाही.
संचार बंदीची काटेकोर अंमलबजावणी
संपूर्ण देशात संचारबंदी लागू आहे. शहरात देखील संचारबंदी लागू आहे. त्यामुळे यापुढे विनाकारण नागरिक रस्त्यावर आले तर, त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई होणार आहे पोलिस प्रशासनासह महसूल प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी देखील रस्त्यावर उतरून विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना चोप देणार आहेत. एवढेच नाही तर त्यांचे वाहन जप्त करून, गुन्हा दाखल करणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी घरातच थांबून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन, उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी यांनी केले आहे.























































