परभणीत उभे राहणार अद्ययावत सायन्स सेंटर, विद्यार्थ्यांची संशोधक वृत्ती जपणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परभणीच्या विद्यार्थ्यांना संशोधनात जागतिक पातळीवर नावलौकिक व्हावे, यासाठी आणि सतत नवनवे प्रयोग करून संशोधनवृत्ती जपण्यासाठी राज्य सरकारच्या मदतीने सायन्स सेंटर उभे राहत आहे. या सेंटरच्या उभारणीसाठी राज्य सरकारने आतापर्यंत 3 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार असून आणखी 5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी व वनामकृवी यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसांचे विज्ञान चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी आमदार डॉ. राहुल पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आर्टिफिशीयल इंटेलिजेन्सी, रोबोटीक टेक्नॉलॉजी, सोलार एनर्जी, ग्रीन एनर्जी या क्षेत्रांमध्ये येत्या काळात विज्ञान युगाच्या क्रांतीने मानवी जीवन विकसित होणार असल्याने विज्ञान शाखेच्या विज्ञार्थ्यांनी केवळ डॉक्टर, इंजिनीअर होण्याऐवजी शास्त्र्ाज्ञ होऊन देशाचे नाव उज्वल करावे, असे आवाहन डॉ. पाटील यांनी केले. सेंटरच्या निर्मितीसाठी 3 कोटी रुपयांचा निधी उद्धव ठाकरे सरकारने उपलब्ध करून दिला असून पुढील काळात आणखीन 5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देऊ, असे पाटील यांनी सांगितले. यावेळी अधिष्ठाता डॉ. धर्मराज गोखले, कुलसचिव डॉ. धीरज कुमार कदम, प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल, ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. रामेश्वर नाईक, शास्त्र्ाज्ञ डॉ. विवेक मोन्टेरीयो, डॉ. ग़ीता महाशब्दे, डॉ. ग़ुरिंदर सिंग, डॉ. धनंजय रावळ आदी उपस्थित होते.