
सामना प्रतिनिधी, मुंबई
एल्फिन्स्टन रोड दुर्घटनेनंतर वेगाने विकसित करण्यात आलेल्या परळ टर्मिनसचे काम जवळपास पूर्ण झाले असून येत्या रविवार, 3 मार्च रोजी त्याचे उद्घाटन होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नव्या परळ टर्मिनसमधून 16 अप आणि 16 डाऊन अशा एकूण 32 परळ लोकल सोडण्याची योजना असून ती मंजुरीकरिता रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आली आहे. परळ लोकलमुळे परळच्या गर्दीची कोंडी फुटणार असून गर्दीने मेटाकुटीला आलेल्या रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
दुसरे दादर म्हणून ओळखले जाणारे मध्य रेल्वेचे परळ स्थानक गिरण्यांच्या जमिनींवर उभारलेल्या टॉवर तसेच कॉर्पोरेट ऑफिसेसमुळे महत्त्वाचे स्थानक ठरले आहे. या स्थानकाच्या आजूबाजूला देशातील कॅन्सरवर उपचार देणारे सर्वात मोठे टाटा रुग्णालय, केईएम, वाडिया प्रसूतिगृह रुग्णालयांसारखी महत्त्वाची रुग्णालये असल्याने येथे कायम गर्दी असते. तसेच दादरवरून पश्चिम रेल्वेला जाण्यापेक्षा परळवरून पादचारी पुलाने पश्चिम रेल्वेचे प्रभादेवी (एल्फिन्स्टन रोड) स्थानक गाठून चर्चगेट तसेच विरार दिशेला जाणाऱयांची संख्या मोठी आहे.
पश्चिम रेल्वेच्या प्रभादेवी (एल्फिन्स्टन रोड) स्थानकाच्या पुलावर 29 सप्टेंबर 2017 रोजी झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल 23 जणांचा बळी गेल्याने गेली अनेक वर्षे रखडलेल्या परळ टर्मिनसला एकदाची चालना मिळाली. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी स्वतः लक्ष घालून कर्मचाऱ्यांना युद्धपातळीवर काम करण्याचे आदेश दिले. त्यामुळे साधारण एक वर्षातच आधुनिक सोयीसुविधा असलेले परळ टर्मिनस बांधून पूर्णत्वास आले आहे.
पहिली परळ लोकल सकाळी 8.38 वाजता
परळ येथे होणाऱया प्रचंड गर्दीमुळे प्रवाशांना दिलासा देण्यासाठी कल्याणच्या दिशेने सुमारे 16 अप आणि मुंबईच्या दिशेने 16 डाऊन परळ लोकल सोडण्याची योजना आहे. दादर लोकलच्या 32 फेऱ्यांचे रूपांतर परळ लोकलमध्ये करण्यात येऊन त्यांची वेळ तीन मिनिटांनी मागे पुढे करण्यात आली आहे. त्यामुळे सकाळी 8.38 वाजता पहिली परळ लोकल धावण्याचा मार्ग मोकळा झाला असून शेवटची परळ लोकल रा.11.15 वाजता सुटणार आहे.
प्रथमच बायोटॉयलेटस्ची सुविधा
परळ टर्मिनसच्या परळ लोकल थांबणाऱ्या फलाटाचे काम पूर्ण करण्यात येऊन अंतिम हात फिरवला जात आहे. येथे आणखी एक लिफ्ट आणि सरकता जिना बसविण्यात येत आहे. तसेच डाऊन दिशेच्या फलाटावरही एक सरकता जिना आणि लिफ्ट उभारण्यात आली आहे. पूर्व ते पश्चिम जोडणाऱया नव्या 12 मीटर रुंदीचा पादचारी पूल डाऊन कल्याण दिशेच्या फलाटाला जोडण्यात आला आहे. तसेच पश्चिम रेल्वेच्या प्रभादेवी स्थानकाच्या उत्तर दिशेला फलाटाची लांबी वाढवत त्यासही 12 मीटरच्या पादचारी पुलाला जोडण्यात आले आहे. तसेच परळ स्थानकातील टर्मिनस फलाटावर सीएसएमटीच्या दिशेला दोन बायोटॉयलेटस् बसविण्यात आली आहेत.
























































