बलात्कार करायला घरी माणसं पाठवू! फडणवीसांचे ‘खास’ परिणय फुके यांच्या कुटुंबाकडून प्रिया फुके यांना धमकी

राज्यात महिला अत्याचाराच्या प्रकरणांत सातत्याने वाढ होत आहे. याविरोधात आवाज उठविणाऱया महिलांना सत्तेचा धाक दाखवून धमकावण्याचे प्रकार घडत आहेत. मुख्यमंत्री फडणवीसांचे खासम्खास असलेले भाजप आमदार परिणय फुके यांच्या कुटुंबाकडूनच सुनेला बलात्कार करायला घरी माणसं पाठविण्याची धमकी देण्यात आल्याचा खळबळजनक आरोप प्रिया संकेत फुके यांनी केला.

भाजपचे विधान परिषदेतील आमदार आणि माजी राज्यमंत्री परिणय फुके यांची भावजय प्रिया फुके यांनी आज पत्रकार परिषद घेऊन फुके कुटुंबीयांकडून आपल्यावर होत असलेल्या अत्याचाराचा पाढा वाचला. संकेत फुके यांना असलेला किडनीचा आजार लपवून ठेवून त्यांचे लग्न करण्यात आले. लग्नानंतर काही महिन्यांनी मला याची माहिती मिळाल्यावर याबाबत विचारणा केली असता बाहेर कोणाला याबाबत बोललीस तर तुला व तुझ्या कुटुंबाला इजा पोहोचवली जाईल. बलात्कार करण्यासाठी तुझ्या घरी माणसं पाठवू, असे धमकावण्यात आले. पती संकेत यांच्या निधनानंतरही सासरच्या मंडळींकडून आपल्याला त्रास दिला जात असल्याचा आरोप प्रिया फुके यांनी केला आहे.

पतीच्या मृत्यूनंतर मी घरात पतीचा पैशांचा कारभार आणि मालमत्तेविषयी प्रश्न विचारले, मात्र मला तू कोण आहे असा प्रश्न विचारण्यात आला. इतकेच नाही तर रात्री मला घराबाहेर काढण्यात आले. दीड वर्षापासून आईच्या घरी राहते. आजही अज्ञात व्यक्ती माझा पाठलाग करीत असतात. मला जिवे मारण्याची धमकी दिली जाते. परिणय फुके यांच्याकडून मला धमकी दिली जात असे, असे प्रिया फुके यांनी सांगितले.

फडणवीस, महिला आयोगाकडून मदत नाही

देवेंद्र फडणवीस यांना तीन वेळा भेटले. कागदपत्रे दिली, पण त्यांनी यामध्ये काहीच कारवाई केली नाही. महिला आयोगाला मी 2024 मध्ये तक्रार दिली, पण त्यांनी मला काहीच मदत केली नाही. मी गेल्या दीड वर्षापासून लढतेय, पोलीस ठाण्याचे हेलपाटे मारतेय, मुख्यमंत्र्यांपासून राज्याच्या राजकारणातील अनेक भावांना भेटले, अनेकांकडे मदत मागितली. मात्र कोणीही माझ्या पाठी उभे राहून न्याय मिळवून दिला नाही, असे प्रिया म्हणाल्या.

किडनीचा आजार लपवून केले लग्न

भाजप आमदार परिणय फुके यांचे धाकटे बंधू संकेत याच्याशी 2012 मध्ये प्रिया यांचे लग्न झाले होते. त्यानंतर दहा वर्षांनंतर किडनी संसर्गातून 2022 मध्ये संकेत यांचा मृत्यू झाला. संकेत फुके यांचे लग्नापूर्वी किडनी ट्रान्सप्लांट झाले होते, मात्र फुके कुटुंबीयांनी ही माहिती लपवून ठेवत फसवणूक करून संकेत यांच्याशी आपले लग्न लावल्याचा आरोप प्रिया फुके यांनी केला आहे.

मुलांच्या कस्टडीसाठी दबाव

मला दहा वर्षांचा मुलगा आणि आठ वर्षांची मुलगी आहे. आजी-आजोबांनी कोर्टात केस करून माझ्या मुलांची कस्टडी मागितली आहे. मुलांची आई जिवंत असताना ते कस्टडी कशी मागू शकतात? मी हक्क मागतेय माझा, मी कोणताही त्रास दिला नाही. मात्र, काहीतरी करून आम्हाला दाबायचा प्रयत्न होत आहे, असे प्रिया फुके म्हणाल्या.

सरकारने लाडकी बहीण म्हणून मदत करावी – रोहिणी खडसे

एक महिला म्हणून त्यांना ज्या अडचणी येत आहेत त्या अडचणीकडे सरकारने लाडकी बहीण म्हणून पाहत प्रिया फुपेंना मदत करत लवकरात लवकर गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे. मला वाटले की, महिला आयोगाने तक्रार दाखल करत असताना मदत केली असती तर हे सर्व मार्गी लागले असते, असे राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा रोहिणी खडसे म्हणाल्या.

अजून काहीच कसे झाले नाही? – सुषमा अंधारे

प्रिया फुके यांच्या विनयभंगाची तक्रार घेतली नाही, मात्र आरोपीच्या तक्रारीवरून प्रिया फुपेंवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. प्रिया फुके यांना आरोपाचे पुरावे सादर करा, असा समन्स वारंवार पोलीस पाठवतात. त्यामुळे पत्रकार परिषदेत सर्व पुरावे सादर केले. आता पोलिसांनी संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली.