Video – 20 हजार फुटांवर विमानाला पक्षाची धडक; पायलट केबिनला भगदाड पडलं, प्रवाशांमध्ये घबराट

स्पेनमध्ये एक मोठा विमान अपघात टळला आहे. राजधानी माद्रिदहून पॅरिसच्या दिशेने उड्डाण घेतलेल्या आयबेरियाच्या विमानाला हजारो फुटांवर पक्षाची धडक बसली. ही धडक एवढी मोठी होती की विमानाच्या नाकाला मोठे भगदाड पडले. यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली. अखेर पायलटने प्रसंगावधान राखत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आणि विमान पुन्हा माद्रिदकडे वळवत इमर्जन्सी लँडिंग केले.

उड्डाणानंतर काही क्षणात पक्षी विमानाच्या नाकावर आदळला. यामुळे विमानाच्या बाहेरील भागाला अक्षरश: भगदाड पडले. केबिनमध्येही धूर पसरला. यामुळे प्रवासांमध्ये घबराट पसरली. प्रवाशांनी ऑक्सिजन मास्क सोडले आणि आरडाओरडा सुरू केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सदर विमानाने माद्रिद विमानतळावरून उड्डाण घेतले होते. हे विमान प्रवाशांना घेऊन पॅरिसच्या ऑर्ली येथे पोहोचणार होते. मात्र उड्डाणानंतर 20 मिनिटांनी अचानक विमानाला मोठ्या पक्ष्याने धडक दिली. यामुळे विमानाच्या नाकाजवळ भगदाड पडले. काही वेळाने केबिनमध्ये धुराचे लोट येऊ लागले. प्रवाशांसाठी स्वयंचलित ऑक्सिजन मास्क सोडण्यात आले. व्हिडीओमध्ये हे स्पष्ट दिसत असून मागे एका बाळाच्या रडण्याचा आवाजही येत आहे. तर इतर प्रवाशी घाबरून सीट पकडून बसल्याचे दिसत आहे. प्रवाशांना पुढे काय होणार याचाही खात्री नव्हती. मात्र पायलटने विमान पुन्हा माद्रिदकडे वळवले आणि सुरक्षित लँडिंग केले.

दरम्यान, आयबेरियाने याबाबत अधिकृत निवेदन जारी केले आहे. विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित असून क्रू मेंबरने सदर प्रकार शांतपणे हातळले म्हणून त्यांचे कौतुकही केले. पायलटसह केबिन क्रूने परिस्थिती व्यवस्थित हाताळली आणि प्रवाशांची काळजी घेतली, असे या निवेदनात म्हटले आहे.