जागतिक क्रीडा महासत्ता असलेल्या अमेरिकेने पॅरिस ऑलिम्पिकमध्येही पदकतक्त्यात ‘नंबर वन’चे सिंहासन राखले. अमेरिकेला तोडीस तोड देऊनही चीनला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. मात्र 117 खेळाडूंचे पथक असलेल्या हिंदुस्थानला एक रौप्य अन् पाच कांस्य अशा एकूण 6 पदकांसह 71 व्या स्थानावर समाधान मानावे लागले, मात्र स्पर्धेत हिंदुस्थानचे सहा खेळाडू चौथ्या स्थानावर राहिले. दोन खेळाडूंना पदकाने केवळ एका विजयाने हुलकावणी दिली, तर विनेश फोगाट व निशा दहिया यांना नशिबाने दगा दिल्याने ऑलिम्पिक पदकावर नाव कोरता आले नाही.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानने सर्वाधिक 3 पदकं ही नेमबाजीत जिंकली, मात्र याच क्रीडा प्रकारात हिंदुस्थानचे तीन नेमबाज चौथ्या स्थानी राहिले. यामध्ये मनू भाकर ही 25 मीटर पिस्टलच्या अंतिम फेरीत केवळ एका गुणाच्या फरकाने ऑलिम्पिक पदकाच्या हॅटट्रिकपासून वंचित राहिली. अर्जुन बबुता यालाही 10 मीटर एअर रायफलमध्ये 1.5 गुण फरकाने कांस्यपदकाने हुलकावणी दिली. याचबरोबर अनंतजीत सिंह नरूका व माहेश्वरी चौहान या जोडीचेही स्टीक मिश्र सांघिक प्रकारात केवळ 2 गुणांनी कांस्यपदक चुकले. वेटलिफ्टिंगमध्येही टोकियो ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेत्या मीराबाई चानूकडून पदकाच्या अपेक्षा होत्या, मात्र 49 किलो गटातील या स्पर्धेत तिला केवळ 2 किलो वजन कमी उचलल्याने चौथ्या स्थानावर राहावे लागले. याचबरोबर बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने पहिला गेम जिंकल्यानंतरही कांस्यपदकाची लढत गमावली. तिरंदाजीमध्ये मिश्र दुहेरीतील कांस्यपदकाच्या लढतीत धीरज बोम्मदेवारा व अंकिता भकत या हिंदुस्थानी जोडीला अमेरिकन जोडीकडून पराभव पत्करावा लागला.
16 पदके जिंकण्याची संधी गमावली
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये चौथ्या स्थानावर राहिलेल्या खेळाडूंना नशिबाची साथ मिळाली असती किंवा तयारीत थोडी प्रगती असती तरी हिंदुस्थानला ही आणखी सहा पदकं मिळाली असती. याचबरोबर हिंदुस्थानच्या दोन महिला बॉक्सर उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाल्या. त्या उपांत्य फेरीत गेल्या असत्या तरी हिंदुस्थानला बॉक्सिंगमध्येही दोन पदके मिळाली असती. कुस्तीमध्ये विनेश फोगाटला नशिबाने दगा दिल्याने सुवर्णपदकापासून वंचित राहावे लागले, तर निशा दहिया विजयाच्या समिप असताना जायबंदी झाली अन् कुस्ती गमावून बसली. या दोन्ही महिला कुस्तीपटूंना नशिबाने दगा दिल्याने अश्रू अन् हुंदके आवरता आले नाहीत.