
म्हाडा मुख्यालयात लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेला हिरकणी कक्ष पुन्हा पार्किंगच्या विळख्यात अडकला आहे. मुख्यालयासमोरील पार्किंगमध्ये लावण्यात आलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या गाडय़ांमधून वाट काढत या कक्षापर्यंत तान्हय़ा बाळासह पोहोचायचे कसे? कसेबसे कक्षापर्यंत पोहोचले तरी दरवाजाला चिटकून उभ्या असलेल्या गाडय़ांमुळे आत प्रवेश करायचा कसा, असा प्रश्न हिरकणींना सतावत आहे.
म्हाडाच्या गृहनिर्माण भवनाच्या इमारतीमध्ये मुंबई मंडळ, कोकण मंडळ, झोपडपट्टी सुधार मंडळ, इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ अशी विविध कार्यालये आहेत. घराचा ताबा तसेच विविध कामांनिमित्त ताह्या बाळासह म्हाडा भवनात येणाऱ्या महिलांची गैरसोय होऊ नये, यासाठी झोपडपट्टी सुधार मंडळाच्या माध्यमातून म्हाडा मुख्यालयात हिरकणी कक्ष उभारण्यात आला आहे. हा कक्ष पार्किंगच्या एका कोपऱ्यात उभारण्यात आल्यामुळे लगेचच कुणाच्या लक्षात येत नाही. मध्यंतरी या कक्षाकडे महिलांना सहज जाता यावे यासाठी दोरी आणि कुंडय़ांच्या सहाय्याने रस्ता तयार करण्यात आला होता. मात्र पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. पार्किंगमधील गाडय़ांची संख्या वाढली की सोयीनुसार कक्षाकडे जाणारा रस्ता अरुंद केला जातो. त्यामुळे या कक्षात ताह्या बाळासह महिलांनी प्रवेश करायचा कसा, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.