संसदेत आज समान नागरी कायदा विधेयक मांडलं जाणार ? भाजपच्या व्हिपमुळे Twitter वर चर्चा

देशातील बहुसंख्य लोकांची नजर ही सध्या दिल्लीतील निकालांवर खिळलेली आहे. किंबहुना आजचे चित्र हे असेच असणार हे माहिती असताना भाजपने सोमवारी संध्याकाळी संसदेतील दोन्ही सदनातील खासदारांसाठी एक आदेश जारी केला. प्रतोदांनी जारी केलेल्या या आदेशानुसार सगळ्या खासदारांना संसदेत हजर राहण्यास बजावण्यात आले आहे. या आदेशामुळे तऱ्हेतऱ्हेच्या चर्चांना उधाण आलं आहे. एक अंदाज असाही वर्तवला जात आहे की संसदेत समान नागरी कायदा विधेयक मांडण्यासाठी हा आदेश जारी करण्यात आला आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा अखेरचा दिवस आहे. मंगळवारी अर्थमंत्री निर्मला सीतारमण या संसदेच्या दोन्ही सदनांमध्ये अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेला उत्तर देणार आहेत. शेवटच्या दिवशी भाजप खासदारांसाठी व्हिप जारी करण्यात आल्याने काहीतरी महत्वाचे विधेयक मांडले जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. भाजप खासदारांना सदनात हजर राहून सरकारने घेतलेल्या निर्णयाचे समर्थन करावे असे आदेशात म्हटले गेले आहे.

काहींनी अंदाज वर्तवला आहे की मंगळवारी दोन्ही सदनामध्ये करांशी निगडीत एक विधेयक मांडले जाणार आहे, त्यासाठी हा आदेश जारी करण्यात आला असावा. ट्विटरवरील या चर्चेमुळे संसदेत खरोखर काय होणार आहे, याची उत्सुकता वाढली आहे. कोणाचा अंदाज बरोबर ठरतो आणि कोणाचा चुकतो याबाबतही मोठी उत्सुकता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या