‘वंदे मातरम्’वर आज संसदेत चर्चा, उद्या निवडणूक सुधारणांवर घमासान

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला आठवडा वादळी ठरला. उद्यापासून दुसऱ्या आठवडय़ाच्या कामकाजाला सुरुवात होत असून उद्या ‘वंदे मातरम्’वर चर्चा होणार आहे. त्यानंतर मंगळवारी निवडणूक सुधारणांवर वादळी चर्चा होणार आहे. निवडणूक सुधारणेवर चर्चेच्या मागणीसाठी विरोधक अडून राहिले होते. त्यापुढे मोदी सरकारला झुकावे लागले.

पहिल्या आठवडय़ात संसदेच्या दोन्ही सभागृहात फार कामकाज झाले नाही. पहिल्या दिवसापासून विरोधकांनी निवडणूक सुधारणा अर्थात ‘एसआयआर’वर चर्चेची आक्रमक मागणी लावून धरली. सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्यानंतर विरोधकांनी दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ करत कामकाज होऊ दिले नाही. लोकसभा अध्यक्षांच्या आसनासमोर वेलमध्ये येऊन विरोधकांनी जोरदार घोषणा दिल्या. अखेर मोदी सरकारला माघार घ्यावी लागली. निवडणूक सुधारणांवर 9 डिसेंबरला 10 तास चर्चा होणार आहे. ही चर्चादेखील वादळी ठरण्याची शक्यता आहे.

‘वंदे मातरम्’बाबत अनेक अज्ञात पैलू समोर येणार

‘वंदे मातरम्’ला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त लोकसभेत 10 तास चर्चा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या चर्चेची सुरुवात करतील. या चर्चेत काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी या सहभागी होणार असून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे मंगळवारी निवडणूक सुधारणेवर होणाऱ्या चर्चेत सहभागी होतील. राज्यसभेत या विषयांवर मंगळवारी आणि बुधवारी चर्चा होणार आहे. या चर्चेत ‘वंदे मातरम्’बाबत अनेक अज्ञात पैलू देशासमोर येतील, असे जाणकारांचे मत आहे.

‘इंडिगो’वरून सरकारची कोंडी करणार

इंडिगोमुळे प्रवाशांना झालेल्या मनस्तापानंतर हा मुद्दादेखील संसदेत उपस्थित करुन विरोधक सरकारची कोंडी करण्याच्या प्रयत्नात आहेत. अधिवेशन काळात शेकडो उड्डाणे रद्द झाल्यामुळे लोकप्रतिनिधींनाही त्रास झाला. देशाची नाचक्की झाली. त्यामुळे इंडिगो प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे.