संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची तयारी जोरात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर संसदेचे पावसाळी अधिवेशन घेण्याच्या हालचाली जोरात सुरू आहेत. कोरोनामुळे लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांना ‘सोशल डिस्टन्सिंग’ राखून बसण्यासाठी खास व्यवस्था केली जात आहे. त्यासाठी दोन्ही सभागृहांच्या चेंबर्स आणि गॅलरीचाही प्रथमच वापर केला जाणार आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीला होण्याची चिन्हे आहेत.

राज्यसभा सचिवालयाच्या सूत्रांनूसार अधिवेशन सत्रांत वरिष्ठ सभागृहाचे सदस्य दोन्ही चेंबर आणि गॅलरीत बसतील अशी व्यवस्था केली आहे. 1995 नंतर प्रथमच हिंदुस्थानच्या संसद इतिहासात असे बदल केले असून ज्यात 60 सदस्य राज्यसभेच्या चेंबरमध्ये आणि 51 सदस्यांना गॅलरीमध्ये बसविण्यात येईल, तर उर्वरित 132 सदस्यांना लोकसभेच्या चेंबरमध्ये बसविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. विविध पक्षांना त्यांच्या संख्येप्रमाणे राज्यसभा चेंबर आणि गॅलरीत सिट दिल्या जातील, उर्वरितांना लोकसभेच्या चेंबरमध्ये दोन ब्लॉकमध्ये (सत्ताधारी व अन्य) बसण्याची व्यवस्था केली जाईल. राज्यसभेत पंतप्रधान, सभागृह नेते, विरोधीपक्ष नेते आणि अन्य नेत्यांसाठी आसनव्यवस्था असेल.

एसीमध्ये हवेतील व्हायरस मारणारी यंत्रणा

दोन्ही सभागृहांना जोडण्यासाठी स्पेशल केबलचा कापर केला जाईल. त्यामुळे कामकाजाचे दृकश्राव्या माध्यमाद्वारे प्रसारण दोन्ही ठिकाणी बसलेल्या सदस्यांना वेगाने समजेल. तसेच प्रथमच मोठे क्रिन डिस्प्ले, कंसोल्स, पॉलीकॉर्बेनेट सेपरेटरचा वापर तसेच, हवेतील बॅक्टेरिया आणि व्हायरस नष्ट करण्यासाठी एअर कंडीशनिंग सिस्टीममध्ये अल्ट्राक्हॉयलेट जर्मिसिडल इर्रेडिएशन सिस्टीमचा वापर करण्याची योजना आहे.

एक सभागृह सकाळी, तर दुसरे संध्याकाळी

एरव्ही दोन्ही सभागृहांचे काम एकत्र चालते परंतु यंदा अपवाद म्हणून एक सभागृह सकाळी तर दुसरे संध्याकाळी भरेल. राज्यसभेचे अध्यक्ष व्यैकंय्या नायडू ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत सर्व तयारी पूर्ण व्हायला हवी असे निर्देश दिले आहेत. त्यानंतर चाचणी, रंगीत तालिम आणि अंतिम आढावा घेतला जाणार आहे. संसदेचे अंतिम अर्थसंकल्पीय सत्र कोरोनामुळे मध्येच थांबवावे लागले होते. दोन्ही सभागृहांचे कामकाज 23 मार्चपर्यंत स्थगित करण्यात आले होते.