लोकसभेत गदारोळ, माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्या पुस्तकात काय?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकसभेतील गदारोळास कारणीभूत ठरलेल्या माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ या पुस्तकात नेमके काय आहे याची उत्सुकता वाढली आहे. ‘कॅराव्हान’ मासिकातील लेखात त्याबद्दल विस्तृत लिहिण्यात आले आहे. गलवानमधील हिंदुस्थान-चीन संघर्षानंतर ढोकलाम येथे उद्भवलेल्या थराराची ही माहिती आहे. केंद्र सरकारच्या निर्णायकी व बेजबाबदार कारभाराची पोलखोल करणारी ही घटना आहे. तो घटनाक्रम असा…

  • 31 ऑगस्ट 2020 रोजी रात्री सव्वा आठ वाजता हिंदुस्थानी लष्कराच्या नॉर्दन कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल योगेश जोशी यांचा तत्कालीन लष्करप्रमुख जनरल नरवणे यांना फोन येतो. चिनी सैनिकांसह चार रणगाडे पूर्व लडाखमध्ये ‘रेचिन ला’च्या बाजूने हिंदुस्थानी सीमेच्या दिशेने येत आहेत, असे त्यांना सांगितले जाते.
  • घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नरवणे हे तातडीने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना फोन करतात. मात्र, त्यांच्याकडून लगेच कोणतेही उत्तर येत नाही. त्यानंतर नरवणे हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, सीडीएस बिपीन रावत, विदेश मंत्री एस जयशंकर यांच्याशी संपर्क साधतात.
  • माझ्यासाठी आदेश काय आहेत, लष्कराने काय करायला हवे, अशी विचारणा करतात.

परिस्थिती वेगाने बिघडत चालली आहे, हेही ते निदर्शनास आणतात. मात्र, त्यांना कोणतेही ठोस उत्तर मिळत नाही. वरिष्ठांकडून ऑर्डर येत नाहीत तोपर्यंत गोळी चालवू नका, इतकेच त्यांना सांगितले जाते. मिनिटागणिक परिस्थिती नाजूक होत असते.

  • बराच वेळ उत्तर न आल्याने लेफ्टनंट जनरल योगेश जोशी हे पुन्हा जनरल मनोज नरवणे यांना फोन करतात. मात्र, सरकारी पातळीवरून मला अद्याप स्पष्ट सूचना मिळाल्या नाहीत असे नरवणे जोशींना सांगतात. एकीकडे शत्रू चाल करून येतोय आणि दुसरीकडे सरकारचे आदेश नाहीत या कात्रीत लष्कर सापडते.
  • शेवटी रात्री दहा वाजता राजनाथ सिंह हे नरवणे यांना फोन करतात. तुम्हाला जे योग्य वाटेल, ती कारवाई करा, असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश असल्याचे ते मनोज नरवणे यांना सांगतात. हा घटनाक्रम जनरल मनोज नरवणे यांनी आपल्या पुस्तकात लिहिला आहे.

माझ्या हातावर गरम बटाटा ठेवला!

परिस्थिती अशी होती की त्यावेळी चीनला तातडीने काहीतरी उत्तर देण्याची गरज होती, मात्र, सरकारने केवळ आदेशासाठी तब्बल पावणे दोन तासांचा उशीर केला. रात्री दहा वाजता फोन केला खरा, पण निर्णयाची जबाबदारी लष्करावरच ढकलण्यात आली. त्यामुळे जे काही होईल, त्याचा दोष लष्करावर येणार होता. सरकारने कोणतेही स्पष्ट आदेश दिले नाहीत. कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. अशा प्रकारे लष्कराला एकटे पाडले गेले. ’माझ्या हाती एक गरम बटाटा ठेवण्यात आला होता. आता सगळी जबाबदारी माझ्यावर होती, अशा शब्दांत नरवणे यांनी या परिस्थितीचे वर्णन केले आहे.