संसदेचे हिवाळी अधिवेशन, आजपासून मोदी सरकारसाठी फेअरवेल सेशन?

43

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

2019 च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीपूर्वीच्या अखेरच्या संसदीय अधिवेशनाला  उद्या मंगळवारपासून नरेंद्र मोदी सरकार सामोरे जाणार आहे. पंतप्रधान म्हणून मोदींसाठी हे अधिवेशन ‘फेअरवेल सेशन’ ठरणार काय, असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात असतानाच काँगेस अध्यक्ष राहुल गांधींनी काढलेला राफेलचा मुद्दा, राममंदिराचे भाजपा सरकारने भिजत ठेवलेले घोंगडे आणि ईव्हीएम मशीन्सची वैधता यासह अनेक मुद्दय़ांचा दारूगोळा विरोधकांच्या हाती आहे. त्यामुळे दिल्लीत कडाक्याची थंडी असली तरी संसदेच्या या हिवाळी अधिवेशनात विरोधक सत्ताधाऱयांना जाता जाता का होईना घाम फोडणार हे नक्की.
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालाचे फटाके वाजतानाच संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची घंटाही वाजली जाणार आहे. त्यामुळे पाच राज्यांतील निकालांचा स्वाभाविक परिणाम या अधिवेशनात पाहायला मिळेल. मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या राज्यांमध्ये प्रचार करताना सत्ताधाऱयांनी भलतीच पातळी सोडून टीका केली होती. विशेषतः प्रचाराच्या अखेरच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँगेस नेत्या सोनिया गांधींच्या वैधव्यावर केलेली टिप्पणी वादाच्या भोवऱयात सापडली आहे. पंतप्रधानांवर त्यामुळे चहूबाजूनी टीका होत असून काँगेसला आयतीच सहानुभूती यानिमित्ताने मिळाली आहे. प्रचाराच्या घसरलेल्या पातळीचे प्रत्यंतर संसदेच्या अधिवेशनातही पाहायला मिळेल. त्यामुळे हे अधिवेशन ‘गोंधळी’ ठरण्याचीच चिन्हे जास्त आहेत.
विरोधकांनी सहकार्य करावे!
सरकार सर्वच प्रश्नांवर चर्चेला तयार आहे असे सांगतानाच विरोधी पक्षांनी अधिवेशन सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीत केले. जनतेच्या हितासाठी सरकार आणि विरोधी पक्ष यांनी एकमेकांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली पाहिजे, असे ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या