
>> विवेक दिगंबर वैद्य
‘माणगाव’ हे सिंधुदुर्ग जिह्यातील सावंतवाडीजवळचे एक छोटेसे गाव. निर्मला नदी आणि यक्षिणी देवतेचे मंदिर हीच पूर्वापार ओळख असलेले ‘माणगाव’ पुढे चिरंतन प्रसिद्धीस आले ते श्रावण कृ. पंचमी शके 1776 अर्थात सन 1854 मध्ये. निमित्त घडले ते गणेशभट आणि रमाबाई या टेंबे कुटुंबातील दांपत्याला पुत्रलाभ झाला त्याचे. गणेशभटांचे वडील हरिभट टेंबे अतिशय विद्वान वेदमूर्ती गृहस्थ होते.
हरिभटांचे मूळ गाव सावंतवाडी संस्थानामध्ये होते. ऋग्वेदांतर्गत शाकल शाखेच्या, अत्री गोत्राच्या, उत्तम वैदिक आणि याज्ञिकीची कार्ये यथास्थित करणाऱया हरिभटांना माणगाव येथील वेदमूर्ती सीतारामभट कोनकर यांच्या घरी आश्रय लाभला. उपजीविकेसाठी माणगाव येथे आलेल्या हरिभटांचा कोनकरांसोबत परिचय झाला. हरिभटांची विद्वत्ता पाहून माणगाव तसेच पंचक्रोशीतील अन्य गावामधूनही त्यांना लोक बोलावत असत. माणगाव येथे हळूहळू जम बसत असल्याचे पाहून हरिभटांनी गावी राहणाऱया पत्नीला तसेच काशी व गणेश या मुलांना आपल्याकडे बोलावून घेतले. पुढे कोनकर व हरिभटांची घनिष्ठ मैत्री नात्यामध्ये बदलली. विधुर असलेल्या कोनकरांचा विवाह हरीभटांनी आपली मुलगी काशीसोबत करून दिला आणि पुत्र गणेश याचा विवाह कोनकरांची लेक येसूबाई हिच्यासोबत करविला. कोनकरांची पत्नी काशी ही अन्नपूर्णाबाई या नावाने कोनकरांचा संसार पाहू लागली. पुढे दुर्दैवाने काही दिवसातच सीतारामभट कोनकर निवर्तले. अन्नपूर्णा (काशी) विधवा झाली आणि पुढे कोनकरांच्या मिळकतीची वारसदारही झाली. मुलीची काळजी वाहण्याच्या निमित्ताने हरिभट कुटुंबासह माणगाव येथे कायमस्वरूपी वास्तव्य करते झाले आणि अन्नपूर्णाबाईंचा ‘जावई’ या नात्याने गणेशभट माणगावचे वतनदार बनले.
गणेशभटांची वृत्ती सात्त्विक होती. श्रीदत्तात्रेयाचे सातत्याने चिंतन करीत राहणे हा सहज स्थायिभाव असल्याने त्यांना प्रपंचाविषयी फार आस्था नव्हती. गणेशभटांना श्रीदत्ताचे वारंवार दृष्टांत होत असत. त्यानुसार ते सतत गाणगापुरास जात आणि बराच काळ तेथे वास्तव्यही करीत असत. रमाबाईंनादेखील श्रीदत्तभक्ती प्रिय होती. त्यांच्या नित्यक्रमातील बराचसा काळ पुण्यकर्मात व्यतीत होत असे. व्रतवैकल्ये, लक्षवातींचे अनुष्ठान, औदुंबरास लक्ष प्रदक्षिणा, गुरुचरित्राचे वाचन, अतिथींना अन्नदान अन् ग्रामदेवता यक्षिणीदेवीची मनोभावे पूजा करणे यामध्ये त्यांच्या जगण्याचा आनंद दडलेला होता. गणेशभट व रमाबाई या उभयतांच्या निष्काम सेवेने प्रसन्न होऊन श्रीदत्तात्रेयांनी त्यांना शुभसंकेत दिले व त्याची परिणती म्हणून रमाबाईंना संतानप्राप्तीची चाहूल लागली. श्रीदत्तात्रेयांचा स्वप्नदृष्टांत श्रावण कृ. पंचमी, शके 1776 अर्थात सन 1854 च्या रविवारी पुत्रजन्माच्या रूपाने पूर्णत्वास आला. नवजात बालकाचे नाव ‘वासुदेव’ ठेवण्यात आले.
वासुदेवाचे बालपण कोकणातील अन्य लहान मुलांप्रमाणेच गेले. वयाच्या तिसऱया वर्षापासून त्याला अक्षरओळख करविण्यात आली. यक्षिणीच्या देवळाजवळील शाळेत वासुदेव मुळाक्षरे गिरवू लागला. वडील गणेशभट श्रीदत्तोपासनेत व्यग्र असल्यामुळे वासुदेवाला त्यांचे फारसे सान्निध्य लाभले नाही. मात्र आजोबा हरिभट यांनी ही कमतरता भरून काढत आपल्या या नातवावर अपार माया केली. रुपावळी, समासचक्र, अमरकोश, नित्यस्तोत्रपाठ, अष्टाध्याय आणि उपग्रंथांचे शिक्षण त्याला दिले. उपनयन संस्कार झाल्यावर वासुदेव प्रातःसंध्या, सायंसंध्या आणि लौकिक शिक्षणासोबतच वेदमूर्ती उकिडवेशास्त्री आणि वेदमूर्ती ओळकरशास्त्री यांच्याकडे वेदाध्ययनही करता झाला.
पुढे अवघ्या दोन वर्षांत हरिभट निधन पावले आणि वासुदेवावरचे आजोबांचे मायेचे छत्र हरपले. गणेशभट तेव्हा गाणगापुरात होते. घरी लक्ष देण्यास कुणी कर्ता पुरुष उरला नाही. डोक्यावर कर्जाचा बोजाही वाढतच राहिलेला पाहून अन्नपूर्णाबाईंनी जवळच्या एका नातलगाला, नाना कोनकर यांना बोलावून घेतले व त्यांच्या हाती घराचा कारभार सोपविला. वासुदेवही त्याच्या परीने घरखर्चाला हातभार लावत होता. वासुदेवाचे वेदाध्ययन उत्तम रीतीने चालले होते. कुशाग्र बुद्धिमत्ता लाभलेल्या वासुदेवाच्या बऱ्याचशा संथा एव्हाना मुखोद्गतही झाल्या होत्या, शिवाय वेदमूर्ती संभूशास्त्री साधले यांच्याकडे संस्कृताभ्यास आणि ज्योतिषशास्त्राचा अभ्यासही तितक्याच जोमाने सुरू होता. यासोबतच गृहप्रपंच चालविण्यासाठी वासुदेव यजमानांच्या घरी जाऊन पौरोहित्य कर्म करीत असे. वासुदेवासाठी हा काळ अतिशय खडतर होता. कडकडीत वैराग्य, अवघड नेमनियम, जिद्द, अपार मेहनत, दृढ व निश्चयी स्वभाव यांच्या बळावर वासुदेवाने विद्याभ्यास पूर्ण केला.
पुढे जिज्ञासा, ज्ञानलालसा, ज्योतिषशास्त्राचे अचूक नेमके आकलन आणि वर्तवलेली अन् तंतोतंत सत्यात उतरलेली भाकिते यामुळे वासुदेव केवळ प्रसिद्धीसच आला नाही तर सर्वदूर ‘वासुदेवशास्त्री’ या आदरयुक्त संबोधनाने ओळखही निर्माण करता झाला. वासुदेवशास्त्री एकवीस वर्षांचे झाले. त्यांच्या लग्नाचे वय झाले आहे हे गृहीत धरून आप्तेष्ट विवाहोत्सुक मुलगी शोधू लागले. रांगणागड येथील बाबाजीपंत गोडे यांची कन्या बायो हिच्यासोबत वासुदेवशास्त्रीचा विवाह निश्चित करण्यात आला. याप्रसंगी वासुदेव किंवा त्यांच्या घरच्यांचीही संमती न घेता नाना कोनकर यांनी परस्पर होकार देऊन वासुदेवांना बोहल्यावर चढवले. केवळ घरच्यांच्या इच्छेला महत्त्व देत वासुदेवशास्त्री लग्नाला तयार झाले. विवाह सोहळा पार पडला. मातापिता आणि आठ भावंडे यांचा लौकिक प्रपंचामध्ये आता लग्न झाल्यामुळे एक माणूस वाढले, उत्पन्नात मात्र म्हणावी तशी वाढ नव्हती म्हणून वासुदेवशास्त्रीनी पत्नीसहित घर सोडले आणि ते गोव्यातील ‘पेडणे’ गावी आले.
पेडणे येथे आल्यावर वासुदेवांनी तेथील प्रख्यात ज्योतिषी नीळकंठ पद्ये यांच्याकडे सहा महिने ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला. मात्र त्यादरम्यान वडील गणेशभट आजारी असल्याचे समजल्यावर वासुदेव माघारी परतले. काही दिवसांतच गणेशपंतांनी इहलोक त्यागला. पुढील काळात वासुदेवशास्त्रीचे वेदमंत्र उत्तमरीत्या सिद्ध झाले. त्यांच्या मुखातून प्रसवलेल्या मंत्राच्या सामर्थ्याने अनेकांच्या समस्या दूर झाल्या. समंधबाधा, पिशाच्चत्रास, आजारपण यांवर ते लीलया इलाज करीत असत. वरकरणी सर्व यथायोग्य चालले असले तरीदेखील घर मात्र कलहछायेखाली होते. आई रमाबाई आणि पत्नी अन्नपूर्णाबाई यांच्यामधून विस्तवही जाऊ नये अशी परिस्थिती दररोज उद्भवत असे. प्रपंचाच्या या विचित्र वळणावर वासुदेवशास्त्री विरक्तीकडे खेचले जात होते. यातूनच त्यांच्या मनात संन्यास घेण्याची इच्छा जागृत झाली. प्रपंचाचा त्याग करून नरसोबाच्या वाडीस कायमचे निघून जावे असा विचार त्यांच्या मनामध्ये येऊ लागला. याच काळात ते एकदा आपल्या मातोश्रींसह नाशिक येथे गेले असता त्यांची भेट प्रख्यात सत्पुरुष श्रीदेव मामलेदार यांच्यासोबत झाली.
(पूर्वार्ध)




























































