भगवान परशुराम जयंतीच्या शानदार शोभायात्रेने वेधले परळीकरांचे लक्ष

39

सामना प्रतिनिधी । परळी वैजनाथ

भगवान परशुराम यांच्या जयंती निमित्त परळी शहरात मंगळवारी शानदार शोभायात्रा काढण्यात आली. शांतता व शिस्तीच्या आदर्शाने शोभायात्रा लक्षवेधी ठरली. या शोभायात्रेत मोठ्या संख्येने ब्रह्मवृंद सहभागी झाले होते. शहरातील सकल ब्राह्मण समाज यांच्या वतीने या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या शोभायात्रेत युवकांनी लाठी काठीचे खेळही सादर केले.

संत जगमित्रनागा मंदिर येथून शोभायात्रेला प्रारंभ झाला. प्रारंभी भगवान परशुराम प्रतिमेचे पूजन करून व माल्यार्पण करून शोभायात्रेस सुरूवात झाली. नेहरू चौक – राणी लक्ष्मीबाई टॉवर चौक – गणेशपार – नांदूरवेस – अंबेवेस – वैद्यनाथ मंदिर मार्गे संत जगमित्रनागा मंदिर पर्यंत नगर प्रदक्षिणा करण्यात आली. आरतीने जन्मोत्सव सोहळ्याचा समारोप झाला. या दिव्य सोहळ्यात समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. ब्राह्मण समाज बांधव सहकुटुंब या शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या सोहळ्यात महिलांचा लक्षणिय सहभाग होता.

परळी शहरातून मुख्य मार्गावर शांतता व शिस्तीच्या आदर्शाने निघालेली शोभायात्रा लक्षवेधी ठरली. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’, ‘जय श्रीराम – जय परशुराम’ च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. ठिकठिकाणी शोभायात्रेचे स्वागत करून नागरीकांनी भगवान परशुरामाचे दर्शन घेतले. जुन्या गावभागात जागोजागी रांगोळी व महिलांनी भगवान परशुरामांचे औक्षण करून दर्शन घेतले. या शोभायात्रेत मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते. या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी सकल ब्राह्मण समाज आयोजित भगवान परशुराम जन्मोत्सव समितीचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.

आपली प्रतिक्रिया द्या