
मध्य रेल्वे मार्गावर अपघाती मृत्यूचे सत्र सुरूच आहे. लोकल प्रवाशांचा प्रवास सुरक्षित करण्याकामी प्रशासन अपयशी ठरल्याने प्रवाशी संघटना आक्रमक झाल्या आहेत. बारावीच्या परीक्षेला चाललेल्या डोंबिवलीतील विद्यार्थ्याचा लोकल ट्रेनमधून पडून मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर प्रवाशी संघटना बुधवारी काळे कपडे घालून रेल्वे प्रशासनाच्या निक्रियतेचा निषेध करणार आहेत.
उपनगरी रेल्वे मार्गावर गेल्या वर्षी 2287 प्रवाशांचा अपघाती मृत्यू झाला. दररोज आठ ते दहा प्रवाशी रेल्वे मार्गावरील विविध अपघातांत जीव गमावत आहेत. लोकल फेऱयांचे चुकीचे नियोजन, एसी लोकल फेऱया वाढवून साध्या लोकल फेऱयांची कपात आदी कारणांमुळे लोकलमधील जीवघेण्या गर्दीचा प्रश्न गंभीर बनला आहे. रेल्वे मोठमोठय़ा प्रकल्पांच्या घोषणा करते. मात्र गर्दीचे नियोजन करण्यात प्रशासन कुचकामी ठरले आहे. याच अनुषंगाने प्रवाशी संघटना आक्रमक झाल्या आहेत. प्रशासनाला सामान्य, मध्यमवर्गीयांच्या जिवाची किंमत शून्य आहे. याच अनास्थेचा निषेध करण्यासाठी बुधवारी ठाणे रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशी संघटनांचे पदाधिकारी-सदस्य एकत्र येणार आहेत, अशी माहिती मुंबई रेल प्रवाशी संघाचे उपाध्यक्ष सिद्धेश देसाई यांनी दिली. लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी जाहीर केलेले प्रकल्प कागदावरच असल्यामुळे लोकांचे हकनाक बळी जात आहेत, असा दावा रेल्वे अभ्यासक अक्षय महापदी यांनी केला. प्रशासनाच्या निक्रियतेमुळे प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

























































