नवी मुंबई विमानतळावर सुविधा नसल्याने प्रवाशांचे हाल; सोयी नाहीत सेवा सुरू का केली, विरोधकांचा संताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सरकारने मोठा गाजावाजा करीत नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन करून डोमेस्टीक उड्डाणे सुरू केली असली तरी या ठिकाणी वाहतुकीसह हॉटेल आणि वैद्यकीयसारख्या कोणत्याही मूलभूत सुविधा नसल्यामुळे प्रवाशांना प्रचंड हाल सहन करावे लागत आहेत. त्यामुळे या ठिकाणी प्रवाशांना आवश्यक असणाऱ्या सुविधा तातडीने उपलब्ध करून द्या, अशी मागणी विरोधकांकडून विधान परिषदेत आज करण्यात आली.

मुंबई विमानतळावरील ताण कमी करणे आणि आशियातील सर्वात मोठे विमानतळ बनवण्याच्या उद्देशाने नवी मुंबई विमानतळ सुरू करण्यात आले आहे. मात्र या विमानतळ परिसरात सध्या प्रचंड गैरसोयी आहेत. नवी मुंबई मेट्रोचे काम अपूर्ण असल्याने आणि नागपूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर यांच्यासारख्या शहरातून येणाऱ्या विमानांना सकाळी मुंबईत उतरण्यास मोठी अडचण होत असल्याकडे आमदार सत्यजीत तांबे यांनी लक्ष वेधले. सुविधा नसताना विमानतळ का सुरू केले, असा सवाल शिवसेना आमदार सचिन अहिर यांनी उपस्थित केला. शिवडी-न्हावाशेवा कनेक्टिव्हिटी अजूनही झालेली नाही. आता जे काही रस्ते आहेत, त्यांची दुरवस्था झालेली आहे. ती कनेक्टिव्हिटी तुम्ही किती दिवसांत पूर्ण करणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. यावर संबंधित प्रश्नांबाबत लवकरच बैठक आयोजित करून आवश्यक सुविधांबाबत निर्णय घेण्यात येतील, असे आश्वासन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिले.