
अपंग, दिव्यांग हे शब्द कानावर पडले की, मनात त्वरित भावना निर्माण होते ती सहानुभूतीची. मात्र मर्यादित संवेदनशीलता न दाखविता केवळ शारीरिकच नव्हे तर, मानसिकदृष्टय़ाही अपंगत्व आलेल्या व्यक्तीला स्वतःच्या पायावर उभे करणे हे जास्त महत्त्वाचे असते. याच भावनेतून 2019 मध्ये सुधाताई वाघ, मिलिंद तेंडुलकर, अरुण वालावलकर, अपर्णा कायकीणी, विजय कलमकर या समविचारी मंडळींनी तळमळीने एकत्र येऊन दहिसर पूर्व येथे स्थापन केलेली संस्था म्हणजे स्नेहज्योत दिव्यांग सेवा प्रतिष्ठान.
‘‘आत्मविश्वासपूर्ण जगू पाहणाऱया प्रत्येक दिव्यांगाला सामान्य व्यक्तीप्रमाणेच समानतेची वागणूक मिळावी म्हणून स्नेहज्योत दिव्यांग पुनर्वसन कार्यात स्वतःला झोकून देत यशस्वी वाटचाल करत आहे. तसेच दिव्यांग मुलांच्या पालकांचे मनोबल वाढविण्याचे महत्त्वाचे कार्यही स्नेहज्योत करते. आमच्याकडे कोणतेही मानधन न घेता मनोभावे सेवा करणारी सेवाव्रतींची फळी आहे, ही अतिशय समाधानाची बाब आहे,’’ अशी भावना गेली 38 वर्षे या क्षेत्रात कार्यरत असलेल्या सुधाताई यांनी व्यक्त केली.
समाजाने स्वीकारण्याआधी सर्वप्रथम दिव्यांग व्यक्तीने स्वतः त्याचे अपंगत्व स्वीकारणे खूप महत्त्वाचे असते आणि त्यातूनच त्याचा हा न्यूनगंड निघू शकतो. यासाठी स्नेहज्योतने दिव्यांग व्यक्तींच्या समुपदेशनाचे महत्त्वाचे कार्य हाती घेतले आहे.
अनेक दिव्यांगांचे पालक हे आर्थिक परिस्थितीमुळे मुलांना व्यवस्थित शिक्षण देऊ शकत नाहीत. हे लक्षात घेऊन या मुलांच्या शिक्षणाची तसेच त्यांना विविध कलाकाwशल्याचे प्रशिक्षण देऊन व्यवसाय उपलब्ध करून देण्याची जबाबदारी स्नेहज्योतने घेतली आहे. तसेच दिव्यांग व्यक्तींसाठी करण्यात आलेल्या अनेक सरकारी योजना या त्यांच्या क्लिष्ट स्वरूपामुळे दिव्यांग व्यक्तींपर्यंत पोहोचतच नाहीत. दिव्यांगांपर्यंत विविध सरकारी योजना पोचवण्याचे काम ही संस्था करत आहे.
संस्थेत 3 डिसेंबर या ‘जागतिक दिव्यांग दिनी’ क्रीडा महोत्सव साजरा केला जातो. विविध खेळांमध्ये नैपुण्य आणि पुरस्कार मिळवलेल्या दिव्यांग व्यक्तींचा ‘स्नेहज्योत शक्तिशाली व्यक्तिमत्त्व पुरस्कार’ देऊन सत्कार केला जातो. दिव्यांग व्यक्तींसाठी एक अद्ययावत फिजिओथेरपी सेंटर स्थापन करणे, हे स्नेहज्योतचे भविष्यातील स्वप्न आहे.
आज स्नेहज्योत समोर सगळय़ात मोठी अडचण आहे, ती म्हणजे त्यांची हक्काची जागा. यासाठी संस्थेचे शासन दरबारी प्रयत्न चालूच आहेत. स्नेहज्योतसारख्या खऱया अर्थाने दिव्यांग पुनर्वसन प्रक्रियेची व्याख्या कळलेल्या आणि मूलभूत कार्य उभे करण्याची क्षमता असलेल्या संस्थेला त्यांची हक्काची कायमस्वरूपी जागा मिळावी, ही शुभेच्छा.
कौशल्यपूर्ण प्रशिक्षण
आजघडीला स्नेहज्योतचे काwशल्य विकास प्रशिक्षण पेंद्र म्हणजे आनंदाचा झरा झाला आहे. वर्षानुवर्षे ज्या दिव्यांग व्यक्ती घराबाहेर पडल्या नाहीत, त्या आज या संस्थेत येऊन कापडापासून अनेक कलात्मक पर्सेस व इतर वस्तू, त्याचप्रमाणे कागदापासून विविध प्रकारची फुले आणि बुके बनवण्याचे प्रशिक्षण घेत आहेत. त्यांनी निर्माण केलेल्या वस्तूंची प्रदर्शन आणि विक्री होऊन जेव्हा महिन्याकाठी त्यांना त्यांच्या मेहनतीचा मोबदला मिळतो तेव्हा त्यांच्यासाठी ते फक्त पैसे नसतात, तर अनेक वर्षे दबलेला आत्मविश्वास पुन्हा नव्याने मिळवण्याची ती एक भावना असते.
अनोखा प्रयोग
नुकतेच निओमोशन या पंपनीसोबत टायअप करून एका विशिष्ट
इलेक्ट्रॉनिक व्हीलचेअर कम स्कूटरच्या सहाय्याने तीन दिव्यांग व्यक्तींना झोमॅटो डिलिव्हरीचा रोजगार स्नेहज्योतच्या पुढाकाराने देण्यात आला. फूड डिलिव्हरी क्षेत्रात हा आगळावेगळा प्रयोग स्नेहज्योतने हिमतीने यशस्वी केला आहे.
अनघा सावंत
























































