
सोशल मीडियाच्या या जगात आर्थिक व्यवहार देखील ऑनलाईन केले जात आहेत. यात दिवसेंदिवस वाढ होत असून यासाठी अनेक ऍपही आहेत. मात्र तुमच्या पैशांवर हॅकर्सचा डोळा असून पासवर्ड हॅक करण्यासाठी अनेक ओपन सोर्स पासवर्ड हॅकिंग सॉफ्टवेअर देखील आहेत. तुमचा पासवर्ड जर कमकुवत असेल तर तो हॅक करणे हॅकर्सला अधिक सोपे जाते आणि यामुळे तुम्हाला चुना लागण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते.
एका रिपोर्ट नुसार हिंदुस्थानमध्ये प्रत्येक 4 व्यक्तिमागे एका व्यक्तीचा पासवर्ड सोपा किंवा कमकुवत (उदा. जन्मतारीख, नाव इ.) असतो, यामुळे अशी लोकं हॅकर्सच्या निशाण्यावर येतात. कमकुवत पासवर्ड म्हणजे काय तर जो लवकर डिकोड केला जाऊ शकतो. तुमचा खासगी डाटा, अकाउंट यामध्ये आणि हॅकर्स यांच्या पासवर्ड नावाची भिंत असते. तीच जर कमकुवत असेल तर हॅकर्स सहजासहजी तुमच्या माहितीवर, पैशांवर डल्ला मारू शकतात.
हे लोक बनतात सहजपणे शिकार
सोशल मीडियावर युजर्सची चॅनेल अकाउंट असतात. (उदा. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम इ.) तसेच जीमेल अकाउंट, बँक अकाउंट ऍप, शेअर मार्केट संबंधी ऍप, ऑनलाईन व्यवहारांसाठीचे ऍप यासह असे अनेक ऍप आहेत त्यात युजर्सचे माहिती आणि पैसे संकलित असतात. रिपोर्टनुसार एका व्यक्तीचे 25 हुन अधिक वेगवेगळ्या स्वरूपाचे अकाउंट असतात आणि या सर्वांचे वेगवेगळे पासवर्ड ठेवल्यास ते लक्षात ठेवणे जिकरीचे काम असते. त्यामुळे युजर्स एकप्रकारचेच पासवर्ड ठेवतात (उदा. VRS1342, 2431SRV इ.) हीच लोक हॅकर्सच्या निशाण्यावर असतात.
अशी घ्या काळजी
सायबर तज्ज्ञांच्या मते, अनेक लोक वेब ब्राउझरवर आपला पासवर्ड सेव्ह करून ठेवतात. तर काही लोक कॉम्प्युटर किंवा मोबाईलच्या नोट बुकमध्ये आपले पासवर्ड सेव्ह करतात. तसेच बहुतांश लोक 5 ते 6 अंकी किंवा शब्दांचा पासवर्ड ठेवतात. मात्र असे पासवर्ड हॅक करण्यास फक्त 10 मिनिटं लागतात, तर 6 ते 8 अंकी किंवा शब्दांचा पासवर्ड हॅक करायला अर्धा तास लागतो. मात्र हाच पासवर्ड जर 8 ते 12 अंकी किंवा शब्दांचा असेल तर त्याला डिकोड करणे किंवा क्रॅक करणे अवघड असते. तसेच सिरीयल नंबर किंवा जन्मतारीख, नाव असेही पासवर्ड हॅक करणे सोपे असते असेही तज्ज्ञांनी सांगितले.



























































